मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळी राज्यात सत्ताधारी आण विरोधकांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि वाकयुद्धाविषयी देखील त्यांनी टोलेबाजी केली. राज्यात सध्या कुठल्या गोष्टीची भितीच उरलेली नाही, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच, “काय चालू आहे मला काही कळतच नाहीये. किती वैयक्तिक पातळीवर जायचं आणि काय बोलायचं. साप काय, बेडूक काय.. सगळा झू करून टाकलाय”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सध्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी, आयकर विभाग आणि सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. ईडीनं वारंवार नोटिसा बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे आता ईडीनं अनिल देशमुखांविरोधात लुकआऊट नोटीस देखील काढली आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख नेमके चौकशीसाठी कधी हजर राहणार, अशी चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

ईडी बोलावते, पण ते जात नाहीत…

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कुठल्या गोष्टीची राज्यात भितीच उरलेली नाही. (माजी) गृहमंत्र्यांना इडी बोलावते, ते जात नाहीत. ते ईडीला येडा समजतात बहुधा. सरकारी यंत्रणांनाच तुम्ही दुय्यम मानत आहात. कशाचा पायपोस कशात नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? हा काय खेळ सुरू आहे?” राज ठाकरेंचा संतप्त सवाल!

सगळा झू करून ठेवलाय…

“काय चालू आहे मला काही कळतच नाहीये. किती वैयक्तिक पातळीवर जायचं आणि काय बोलायचं. साप काय, बेडूक काय.. सगळा झू करून टाकलाय. कानफटात मारू वगैरे.. कुठल्या पदावर आपण बसलोय आणि काय बोलतोय”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

सगळेच एकमेकांना फोन करतात की काय…

दरम्यान, राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. “सगळेच एकमेकांना फोन करून सांगतायत की काय.. मूळ प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी आपण हे सगळे खेळ खेळूयात. म्हणजे सगळीकडे बातम्याही त्याच होतील. मूळ प्रश्नावरून दुर्लक्ष करण्यासाठी हे खेळ सुरू आहेत. लोक स्वत:च्याच विवंचनेत आहेत. आत्ता कुठे लॉकडाऊनमधून बाहेर येत आहेत. त्यात सरकारकडून सातत्याने करोनाची भिती घातली जात आहे. त्यांच्या लाटा थांबतच नाहीयेत”, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

“माझे विनोद पचतात, लोकांचे पचत नाहीत आणि अंगाशी येतात त्यांच्या. सगळे माझ्यासारखे विनोद करायला जातात आणि फसतात”, अशी कोपरखळीही राज ठाकरेंनी यावेळी मारली!