मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्री व बहिणीस करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज ठाकरेंना बरं वाटत नसल्यामुळे मुंबईत होणारा मनसे कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, आता राज ठाकरेंना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंना करोनाची सौम्य लक्षणं जाणवत होती. त्यांना ताप देखील आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आणि त्यांच्या मातोश्रींनी करोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र, त्यानंतर देखील त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. पालिकेकडून राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर सॅनिटायझेशन केलं जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, आता राज ठाकरे आणि त्यांच्या बहिणीस लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.

राज ठाकरेंच्या मातोश्रींनी आज सकाळीच लीलावती रुग्णालयाला भेट दिली होती. यानंतर त्यांचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या आई या दोघांना करोनाचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या कुटुंबातील किंवा घरातील इतर सदस्यांच्या चाचणीविषयी किंवा त्यांच्या अहवालांविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, राज ठाकरे आणि त्यांच्या आईंना करोनाची लागण झाली असून इतर सदस्यांपासून त्यांनी घरातच विलगीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मी मास्क घालत नाही, राज ठाकरेंनी केलं होतं स्पष्ट

राज ठाकरेंना याआधी अनेकदा विनामास्क पाहिलं गेलं आहे. अगदी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात जेव्हा राज्यातील करोनाचे रुग्ण वाढत होते, तेव्हा बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला देखील राज ठाकरे मास्क न घालताच पोहोचले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी रोजी मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राज ठाकरे विनामास्क दिसले होते. त्यावेळी पत्रकारांनी मास्क न घालण्याचं कारण विचारलं असता मी मास्क घालत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं.

Photo : राज ठाकरे करोना पॉझिटिव्ह : मास्कला केलेला विरोध पुन्हा चर्चेत; वाचा त्यांनी मास्क न घालण्यासंदर्भातील केलेली वक्तव्ये!

मास्क घालण्याचा तिरस्कार नाही, पण…

दरम्यान, राज ठाकरे मास्क का घालत नाहीत? याविषयी लोकसत्ताच्या दृष्टी आणि कोन या कार्यक्रमात त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी यावर उत्तर दिलं होतं. “मध्यंतरी मला हाताच्या आणि पायाच्या ऑपरेशनसाठी रुग्णालयात जावं लागलं तेव्हा मास्क लावला होता. मला तिरस्कार नाही पण गुदरमल्यासारखं होतं. शिवाजी पार्कात मी पाहिलं तर अनेक लोक मास्क लावून धावत होते. मी म्हटलं एक तर धावू नका किंवा मास्क लावू नका. कुठेतरी बेशुद्ध होऊन पडाल. त्यामुळे मास्क लावण्यास माझा विरोध आहे असं काही नाही”, असं ते म्हणाले होते.

Video : अखेर राज ठाकरेंनी मास्क घातला! पुण्यात बाबासाहेब पुरंदरेंची भेट घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

२० जुलै रोजी राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली होती. यावेळी मात्र त्यांच्या चेहऱ्यावर मास्क पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

More Stories onकरोनाCorona
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray mother corona positive quarantine at krushnakunj pmw
First published on: 23-10-2021 at 17:25 IST