राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करोनाविषयक निर्बंध मागे घेतल्यामुळे यावर्षी हे दोन्ही सण मोठ्या उत्साहात पार पडले. गणेशोत्सव तर मोठ्या धामधुमीत साजरा केला गेला. दरम्यान, गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मनसेचे नेते तथा राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दादर समुद्र किनाऱ्यावर जाऊन गणेश मूर्तींचे अवशेष तसेच निर्माल्य उचलून किनारा स्वच्छ करण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवानिमित्त समाजमाध्यमावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा >>> Photos : विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे दादर चौपाटीवर; वाळूत रुतलेल्या गणेश मूर्तींचे अवशेष उचलून स्वच्छ केला समुद्रकिनारा

राज ठाकरे यांनी गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी मेहनत घेणारे स्थानिक प्रशानस, पोलीस तसेच राज्यातील महानगपालिका, स्थानिक स्वरज्य संस्था यांचे विशेष आभार मानले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सर्वांप्रति कृतज्ञ असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत. “राज्यात गणेशोत्सव निर्वघ्नपणे पार पडला. करोनानंतरचा हा पहिला मोठा सण आहे. हा सण अतिशय उत्साहात पार पडला आणि तोही कोणतंही गालबोट न लागता. यामुळेच महाराष्ट्र पोलीस, विविध महानगपालिका. इतर स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशमन दलाचे मनापासून आभार,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> ‘…म्हणूनच त्यांनी लोकांना पैसे दिले,’ एकनाथ शिंदेंची पैठणमधील सभा आणि व्हायरल ऑडिओ क्लीपवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

“उत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील अगदी हवालदार ते राज्याच्या पोलीस महासंचालक तसेच महापालिका, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे सफाई कर्मचारी ते अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाप्रती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय कृतज्ञ आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.