scorecardresearch

“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”, राज ठाकरेंचा खास संदेश; सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “इंटरनेट नसताना…!”

राज ठाकरे म्हणतात, “महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की जे…!”

raj thackeray mahatma gandhi
राज ठाकरेंचं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून महात्मा गांधींनी अभिवादन! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी देशभरात वेगवेगळ्या प्रकारे देशवासीय महात्मा गांधींना अभिवादन करतात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी दिल्लीत राजघाट येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन केलं. काही मान्यवरांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सोशल मीडियावर महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त खास संदेश पोस्ट केला आहे. तसेच, मनसे रिपोर्ट या ट्विटर हँडलवर राज ठाकरेंच्या भूमिकेची एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

काय आहे राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये?

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये महात्मा गांधी आजही अनुकरणीय का आहेत? यासंदर्भात मत मांडलं आहे. “आज महात्मा गांधीजींची जयंती. व्यक्तिगत ते सार्वजनिक जीवनातील स्वच्छतेसाठीचा आग्रह, स्वच्छ, निर्मळ मन आणि अर्थात स्वच्छ हेतू याच्या सहाय्याने त्यांनी हिंदुस्थानाला स्वातंत्र्याची दिशा नाही दाखवली तर जगाला अनेक शतकं प्रेरणा दिली. जगातील लोकप्रिय नेते गांधीजी होते का किंवा आहेत का? असतीलही किंवा नसतीलही. पण आज देखील त्यांचं अनुकरण करावं असं जगातील लाखो करोडो लोकांना वाटतं, इतकं संचित मागे ठेवून गेलेल्या ह्या महापुरुषाच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

vijay wadettiwar ajit pawar
“अजित पवारांचं हे नेहमीचं आहे, ते कधी नाराज…”, काँग्रेस नेत्याचा टोला; म्हणाले, “…म्हणून त्यांना हे राजकीय आजार होतायत!”
shalini thackeray sushma andhare
“राज ठाकरेंच्या नातवाला जर तुम्ही…”, शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा; म्हणाल्या, “तुम्ही नैराश्येत आहात!”
supriya sule ajit pawar (1)
सुप्रिया सुळेंचं ‘ते’ विधान अजित पवारांसाठी नव्हतं? स्वत:च स्पष्टीकरण देत म्हणाल्या…
What Sambhaji Bhide Said?
संभाजी भिडे म्हणाले, “मराठा आंदोलनावर लाठीचार्ज करणारे शिंदे, फडणवीस आणि पवार नव्हते, यंत्रणा…”

मनसे रिपोर्टनंही राज ठाकरेंच्या भूमिकेसंदर्भातली एक पोस्ट शेअर केली असून त्यात राज ठाकरंनी आपली सविस्तर भूमिका मांडली आहे.

“इंटरनेट नसतानाही…”

“महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की जे देशांच्या सीमा तोडून पसरत गेले. तेही इंटरनेट, सोशल मीडिया, मोबाईल नसताना. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की फक्त भारतातच नव्हे, तर जवळपास तीन खंडांतील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना जमलं, ते पुढे जवळजवळ कोणालाच जमलं नाही”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पुसून टाकण्याचा प्रयत्न होऊनही गांधीविचार शाबूत राहातो……

“विशिष्ट राजकीय-सामाजिक परिस्थितीत प्रबळ वाटणारे नेते आले. कमालीचे लोकप्रिय झाले आणि पुढे काही वर्षांतच मागे पडलेले दिसले. दुसरं महायुद्ध जिंकल्यावर चर्चिल जगाला फॅसिझमच्या विळख्यातून सोडवणारा तारणहार म्हणून पुढे आले. पण त्यांची लोकप्रियता पुढे झपाट्याने ओसरली. याला कारण चर्चिल यांचं योगदान एका विशिष्ट परिस्थितीला पूरक होतं. ते चिरकाल टिकावं असं नव्हतं. पण गांधीजींचं तत्वज्ञान व्यापक होतं”, असंही यात म्हटलं आहे.

“गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”

“शृंखला, मग त्या अज्ञानाच्या असोत की गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या की जातींच्या, त्या शृंखलांनी कुठल्याही माणसाला बांधून ठेवण्याचा अधिकार कुणालाच नाही. कारण सगळी माणसं ही मुळात समान आहेत, इतकं सोपं तत्व त्यांनी स्वीकारलं आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हे खूप कठीण आणि दुर्मिळ आहे. म्हणूनच गांधीजींसारखं बहुदा दुसरं कुणी होणे नाही”, असंही सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns chief raj thackeray post on mahatma gandhi birth anniversary pmw

First published on: 02-10-2023 at 12:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×