Raj Thackeray slams BJP over Mumbai Rain Deaths Controversy: मुंबईतील मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. कुठे झाड कोसळत आहे, तर कुठे उघड्या मॅनहोलमुळे अपघाताची घटना घडत आहे. या दुर्घटनेत दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेनंतर मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच विधिमंडळाच्या आवारात भाजपा आमदारांनी या घटनेंवर बोलत असताना हास्यविनोद केल्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. विरोधकांनीही या घटनेचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परखड प्रश्न विचारले आहेत.
राज ठाकरे यांनी फेसबुकवर एक दीर्घ पोस्ट लिहून भाजपाच्या लोकांना सत्तेचा माज आला आहे, अशी परखड टीका केली. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे? आणि तुम्ही तू पसरू देताय?”
राज ठाकरे पुढे म्हणाले, “देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होते! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे.”

मृत्यूवर आमदार फिदीफिदी हसतो
“तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही आहे”, अशी टीका करताना राज ठाकरे यांनी इंग्रजीतील एक प्रसिद्ध म्हण उद्धृत केली. “कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत”, असे सांगत राज ठाकरेंनी भाजपामधील वाचाळवीरांचा समाचार घेतला.
साहेब…काल झाडावरती होतं आज मॅन होल मध्ये झालं…
— यदुनाथ जवळकर? (@yadujavalkar) July 3, 2026
तेही हसत…
झाड पडून शाळकरी लहान मुलगा ठार झाला याचेही यांना भान नाही.. pic.twitter.com/VmvscaunlP
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
भाजपामधील बेताल वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा अंकुश नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असे महाराष्ट्राला वाटत होते, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.”
“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील”, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला.
नेमके प्रकरण काय?
चेंबूर येथे २९ जून रोजी शाळेच्या बसवर झाड कोसळल्यामुळे एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर साकीनाका येथे २ जुलै रोजी एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांवरून अधिवेशनात वादळी चर्चा झाली. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही मुंबई महानगरपालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनीही या दोन्ही विषयांवर भाष्य केले. त्यानंतर आमदार अमित साटम हे विधिमंडळाच्या पायऱ्यांजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (शरद पवार) जयंत पाटील यांच्याशी हास्यविनोद करताना दिसले. या विषयांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “काल झाडावर होतं, आज मॅनहोल झालं…”. यानंतर दोन्ही नेते हसताना दिसतात.
अमित साटम यांनी काय स्पष्टीकरण दिले?
दरम्यान व्हायरल व्हिडीओवरून टीका होऊ लागल्यानंतर आमदार अमित साटम यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “अर्थाचा अनर्थ करण्याचा प्रयत्न होत आहे. बातम्या देण्यापेक्षा बातम्या तयार करण्याचा प्रयत्न होत आहे”, असे सांगून अमित साटम यांनी त्या व्हिडीओमागची पार्श्वभूमी सांगितली.
आमदार अमित साटम म्हणाले, “मॅनहोलच्या संदर्भात आमची चर्चा सुरू असताना जयंत पाटील त्याठिकाणी आले. त्यांनी म्हटले की, काल मी सभागृहात यासंदर्भात भाषण केले होते. त्यावर मी त्यांना म्हणालो की, काल झाड पडल्याबाबत बोललो होतो, आज मॅनहोलसंदर्भात माणूस पडल्याबाबत बोललो. त्यावर त्यांनी हसून दाद दिली आणि माझ्या पाठीवर थाप मारून ते निघून गेले. त्यानंतर मीही त्यांना स्मितहास्य करत प्रतिसाद दिला.”
