संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असतानाच यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन, पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
बुधवारी सकाळी भारताने उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. भारताच्या A- Sat (अँटी सॅटेलाइट) मिसाईलचं यशस्वी परीक्षण झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिली. पृथ्वीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) ३०० किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह क्षेपणास्त्राद्वारे पाडण्यात आले. अवघ्या तीन मिनिटांमध्ये शास्त्रज्ञांनी ही मोहीम फत्ते केली. मोदींनी या मोहीमेसाठी वैज्ञानिकांचे आभारही मानले. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणतात, एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज? वैज्ञानिकांचे कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या, त्यांना प्रसिद्धी मिळू द्या, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
#SpacePower #ASAT #PMAddressToNation @DRDO_India pic.twitter.com/JILw2DcVsb
— Raj Thackeray (@RajThackeray) March 27, 2019
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील भारताच्या या यशाचे मानकरी असलेल्या डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले असून आम्हाला तुमचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छाही देत चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील ट्विटरवरुन मोदींवर टीका केली.
“DRDO ने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन. चौकीदार आज १५ लाख, नीरव मोदी, मल्ल्या, दाऊद, राफेल यावरील मौन सोडेल असं वाटलं होतं. वैज्ञानिकांचा अभिमान आम्हाला आहेच. पण यात तुमचे योगदान काय? अंतराळत एअर स्ट्राईक केल्याचे सांगून निवडणुकींच्या तोंडावर श्रेय लाटू नका म्हणजे झालं”. असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
