Raj Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालं, तर ठाकरे बंधूंना पराभवाचा धक्का बसला. आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले होते.

यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केलं. यावेळी राज ठाकरे यांनी एक किस्सा सांगितला. राज ठाकरे यांनी किस्सा सांगितल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरे काय म्हणाले?

महापालिका निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे अजारी पडले होते. त्यांना सर्दी, खोकला वैगेरे झालं होतं, त्यानंतर आता मला सर्दी, खोकला, ताप वैगेरे झालं आहे आणि अद्यापही सुरूच आहे. मी काल यांना म्हटलं की मला जास्त बोलता येणार नाही. कारण सर्दीमुळे शब्दांवरील अनुस्वार गेले आहेत. माझे फॅमिली डॉक्टर आहेत, यादव म्हणून. मराठी यादव. मी त्यांच्याकडून औषधे घेतले आणि उद्धव ठाकरे यांना दिले तर ते दोन दिवसांत बरे झाले. पण मी त्याच डॉक्टरांकडून औषधे घेत आहे, आज सहा दिवस झाले. पण तरी मला बरं वाटत नाही. त्यामुळे परवा मी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हटलं की माझ्या डॉक्टरांनी देखील पक्ष बदलला की काय?”, असं राज ठाकरे यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

‘आज बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही’, राज ठाकरे असं का म्हणाले?

“आज महाराष्ट्र आणि देशात राजकारणाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. गुलामांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्रातले आजचे चित्र पाहिल्यानंतर मला असे वाटते, बाळासाहेब नाहीत ते बरंच आहे”, असे उद्विग्न विधान राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असताना केले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आजची परिस्थिती पाहून तो माणूस किती व्यथित झाला असता. त्या माणसाला काय त्रास झाला असता. पूर्वी चावडीवर उभे राहून माणसांचे लिलाव चालायचे, आज त्याप्रमाणे महाराष्ट्रात लिलाव सुरू आहेत. आज सर्व जिल्ह्यात हेच सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याबरोबर माझे बोलणे झाले. सध्याचे चित्र पाहून शिसारी आली. आज हे चित्र पाहायला माननीय बाळासाहेब नाहीत, यापेक्षा चांगली गोष्ट नाही.”

“बाळासाहेब ठाकरे हे पाहूच शकले नसते. त्यांनी शून्यातून गोष्टी उभ्या केल्या होत्या. बाहेरच्या पक्षात बघा. अनेक लोक असे दिसतील, ज्यांना बाळासाहेबांनीच उभे केले होते. मी ज्यावेळी बाहेर पडलो, ते माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या होत्या. माझ्याबाबतीत पक्ष नाही तर घर सोडण्याचा विषय होता. पण त्यालाही २० वर्षांचा काळ लोटला आहे. अनेक गोष्टी मला उमजल्या, उद्धव ठाकरेंनाही अनेक गोष्टी उमजल्या असतील. ते आता सोडून द्या”, असे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या घटनेवर रोखठोक भाष्य केले.