राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबई आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, आज ( शनिवार ६ जुलै ) पुन्हा एक वादग्रस्त विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच विदेशात भारतीयांना मान मिळत आहे, असं ते म्हणाले. यावरून मनसेने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. वादग्रस्त वक्तव्य करून राज्यपालांनी पुन्हा एकदा आपल्या बुद्धीमत्तेची कुवत सिद्ध केली आहे, असे मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी म्हटले आहे.

“परदेशामध्ये जे भारतीय आहेत, त्यांना जो मान मिळत आहे, तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आहे, असं विधान करणं म्हणजे देशावासियांचा अपमान आहे. आम्ही त्यांनी एवढचं सांगतो की जे भारतीय आज विदेशात आहेत आणि देशाचं नाव उंचावत आहेत, ते केवळ त्यांच्या गुणवत्तेमुळे आहेत. ते सर्व लोक ५० वर्षांपासून विदेशात आहेत. त्यामुळे राज्यपालांनी अशी विधानं करून मोदींचा उदोउदो करणे, हे केवळ हास्यास्पद आहे”, अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली. तसेच राज्यपालांनी असे विधान करून पुन्हा एकदा आपल्या बुद्धीमत्तेची कुवत सिद्ध केली आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – राज्यपाल हे भाजपाचे एजंट अन् RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते, अमोल मिटकरींची भगतसिंह कोश्यारींवर बोचरी टीका

काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत वेगाने पुढे जात आहे. मोदी दिवसातून तब्बल २० तास काम करतात, त्यामुळे भारताची जगभरात किर्ती वाढत आहे. जो मान मोदी यांच्या आधी भारतीयांना मान मिळत नव्हता. मात्र, आता तो मिळत आहे”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वीच मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य

काही दिवसांपूर्वीच अंधेरीतील एका कार्यक्रमात बोलताना, “गुजराती आणि राजस्थानी लोकांनी मुंबई सोडली, तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही”, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले होते. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.