MNS demand to demolish Aurangzeb tomb: एमआयएमचे नेते अकबरोद्दीन औवेसी, खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी कार्यकर्त्यांसह खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शन घेतले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी शिवसेनेपासून ते विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपापर्यंत सर्वच प्रमुख पक्षांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान असं असतानाच आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं औरंगजेबचं हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचे संस्थापक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी मनसेनं केली आहे.

नक्की वाचा >> “ज्यांना घरातून बाहेर काढले आहे आणि ज्यांची लायकी…”; अकबरुद्दीन ओवेसींचा राज ठाकरेंवर निशाणा

मनसेनं नेमकं काय म्हटलंय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेला हिंदुत्ववादाच्या मुद्द्याचा संदर्भ देत हे थडगं उद्धवस्त करण्याची मागणी केलीय. “१८ डिसेंबर २००० रोजी ‘सामना’मध्ये दिलेल्या मुलाखतीत बाळासाहेब म्हणतात, “संभाजीनगर येथे असलेलं हे औरंगजेबाचं थडगं जमीनदोस्त झालं पाहिजे. तसेच पुन्हा बांधता कामा नये.” शिवसेनेचं हे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का? हे थडगं जमीनदोस्त होणार आहे का?” असे प्रश्न मनसेनं उपस्थित केलेत.

यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?
तसेच पुढे बोलताना हे थडगं काय अकबरोद्दीन औवेसींसारख्यांना नतमस्तक होण्यासाठी ठेवलं आहे का असा सवाल मनसेनं थेट औवेसींचा उल्लेख टाळत केलाय. “या शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या थडग्याची गरज काय आहे? ही निजामाची औलाद इथं येऊन या थडग्यावर नतमस्तक होणार. यासाठी हे थडगं ठेवलं आहे का?,” असा प्रश्न काळे यांनी उपस्थित केलाय.

हे तरी ऐकणार का?
शिवसेनेवर निशाणा साधताना अनेक गोष्टींवरुन शिवसेनेनं पलटी मारल्याचा टोला लगावत बाळासाहेबांचं हे म्हणणं तरी ऐकणार का अशी विचारणाही मनसेनं केलीय. “आपण संभाजी नगरच्या नामकरणावरुन पलटी मारलेली आहे. बाळासाहेबांनी सांगितलेल्या रस्त्यावरील नमाज, भोंग्यांसंदर्भातील भूमिकेवरुन पलटी मारलेली आहे. किमान बाळासाहेबांचं हे ऐकून या शिवरायांच्या महाराष्ट्रात हे थडगं आपण तोडून टाकणार आहात?, हा आमचा नेमका सवाल आहे. असली नकलीच्या गप्पा मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनी आता आपला चेहरा दाखवूनच द्यावा असं आम्ही आव्हान करतो,” असंही काळे यांनी म्हटलंय.

जलील यांनी दिलेलं स्पष्टीकरण
खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांवर टीका होऊ लागल्यानंतर खासदार जलील यांनी स्पष्टीकरण दिले. जलील म्हणाले, खरे तर खुलताबादमध्ये अनेक दर्गा आहेत. त्यामुळे एकाचे दर्शन घेतले, दुसऱ्याकडे दुर्लक्ष केले असे करता येत नसते. त्यामुळे याचे वेगळे अर्थ काढण्यात येऊ नयेत असे ते म्हणाले. कबरीसमोर नतमस्तक होताना जलील यांनी भगवा रुमाल परिधान केला होता. या विषयी बोलताना ते म्हणाले,”भगवा, हिरवा, निळा सारे रंग माझे आहेत.”

खैरेंनी साधलेला निशाणा
औरंजेबाच्या कबरीसमोर आम्ही कधी नतमस्तक झालो होतो, असा सवाल करणारे खासदार जलील यांची जुनी चलचित्रेही समाजमाध्यमातून आवर्जून फिरत होती. या अनुषंगाने बोलताना माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी, शाळा बांधताय याबद्दल अभिनंदन, पण औरंगजेबाच्या कबरीसमोर नस्तमस्तक होणे ही कृती तेढ निर्माण करणारी असल्याचे म्हटले आहेत.