मनसेच्या इंजिनाचा नुसताच बोलबाला!

केवळ उपचार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाडय़ात उमेदवार दिले खरे, मात्र एकही उमेदवार चमकदार कामगिरी करू शकला नाही. प्रचारादरम्यान ब्ल्यू प्रिंटचा आधार घेत झालेली राज ठाकरे यांची भाषणे आणि जमलेली गर्दी लक्षात घेता काही मतदारसंघांत मनसेचा परिणाम होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उमेदवारांनी एक हजाराहून कमीच मते घेतली.

केवळ उपचार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठवाडय़ात उमेदवार दिले खरे, मात्र एकही उमेदवार चमकदार कामगिरी करू शकला नाही. प्रचारादरम्यान ब्ल्यू प्रिंटचा आधार घेत झालेली राज ठाकरे यांची भाषणे आणि जमलेली गर्दी लक्षात घेता काही मतदारसंघांत मनसेचा परिणाम होईल, असे सांगितले जात होते. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी उमेदवारांनी एक हजाराहून कमीच मते घेतली.
जालना जिल्हय़ातील परतूर मतदारसंघात बाबासाहेब आखात यांना सर्वाधिक ३७ हजार ३३५ मते मिळाली. मात्र, ते या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिले. परभणी मतदारसंघातील विनोद दुधगावकर यांना सर्वात कमी ४५४ मते मिळाली.
औरंगाबाद शहरात मनसेचा बराच बोलबाला केला गेला. केवळ आंदोलन असल्यावरच माध्यमांमध्ये झळकण्यापुरते येणाऱ्या कार्यकर्त्यांना मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. आपल्या भाषणाची छाप टाकणाऱ्या गौतम आमराव यांना १ हजार ८५८, तर औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढविणाऱ्या सुमित खांबेकर थेट नवव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना १ हजार ४१९ मते मिळाली. तुलनेने औरंगाबाद मध्यमधून निवडणूक लढविणाऱ्या राजगौरव वानखेडे यांना ६ हजार २९१ मते मिळाली.
केवळ वृत्तपत्रीय कात्रणांचा आधार घेत आपण मोठे नेते आहोत, असे भासविणाऱ्या अनेकांनी उमेदवारी मागितली होती. एका मतदारसंघात दुसरा दावेदार नसल्याने सढळ हाताने उमेदवारी दिली गेली. मुलाखती घेण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, बाळा नांदगावकर व प्रवीण दरेकर यांची उपस्थिती होती. राज ठाकरे यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. उमेदवारीसाठी इच्छुकांनी केलेल्या गर्दीमुळे मंगल कार्यालयाचे लोखंडी प्रवेशद्वारही कार्यकर्त्यांनी तोडले होते.
या सर्व पाश्र्वभूमीवर मनसेचे उमेदवार चमकदार कामगिरी करतील, असा दावा केला जात होता. परंतु प्रत्यक्षात जिल्हय़ात या पक्षाला फारसा पाठिंबा नसल्याचे चित्र आहे. पैठण मतदारसंघात सुनील शिंदे यांना सर्वाधिक ७ हजार ९१ मते मिळाली, तर सर्वात कमी मते घेणाऱ्यांमध्ये सुमित खांबेकर यांचे नाव आहे.
लातूर जिल्हय़ातील सहा मतदारसंघांत मनसेच्या एकाही उमेदवाराला ३ हजारांचा टप्पा पार करता आला नाही. आंदोलन करताना छायाचित्रकार बरोबर आहे की नाही, एवढे तपासले की संघटनात्मक काम झाले असेच कामाचे स्वरूप झाल्याने मनसेला सर्व जिल्हय़ांतच फटका बसला. मराठवाडय़ात कारणाशिवाय मनसेचे नेते फिरकतही नव्हते. केवळ भाषण द्यायचे आणि निघून जायचे, अशी कार्यशैली असल्याने असलेल्या दहा-बारा जणांतही गटतट असल्याचे चित्र आठही जिल्हय़ांत दिसून येत होते. बीड जिल्हय़ात दोन ठिकाणी उमेदवारच मिळू शकले नाहीत. हिंगोली जिल्हय़ात मनसेच्या उमेदवारांना ५ हजार २३९ मते मिळाली. लातूर जिल्हय़ात २७ हजार ९२, बीड जिल्हय़ात ७ हजार ७९१, नांदेड जिल्हय़ात १३ हजार ७१०, जालन्यात ६९ हजार मते मिळाली, मात्र एकूण मतदानाच्या प्रमाणात ही टक्केवारी नगण्यच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns engine stop