शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या आधी राज्यातील अनेक शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याने विरोधक त्यांना लक्ष्य करत असताना मनसेनेही टोला लगावला आहे. ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो अशा शुभेच्छा मनसेने दिल्या आहेत.

आदित्य ठाकरे १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर; ठाण्यातून शिवसैनिकही रेल्वेने रवाना

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. “अयोध्येला जाऊन रामलल्लाचे दर्शन घेऊन आल्यावर तरी यांचा ढोंगी हिंदुत्वावरुन असली हिंदुत्वाकडे प्रवास सुरू होवो. औरंगाबादचे नाव संभाजीनगर होवो, मशिदीवरचे भोंगे उतरो आणि रस्त्यावरचा नमाज बंद करण्याचे धाडस यांच्यात येवो. विधानपरिषदेत तरी एमआयएम व सपाची मदत न घेण्याची सुबुद्धी मिळो,” असं गजानन काळे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अयोध्याचा दौरा केला होता. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी संजय राऊत अयोध्येला गेले होते. त्यानंतर आता १५ जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार असून सायंकाळी ५.३० वाजता ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत अयोध्येला जाण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक उत्तर प्रदेशकडे निघाले आहेत.

आदित्य ठाकरे १५ जून रोजी सकाळी ११ वाजता लखनऊ विमानतळावर उतरतील. त्यानंतर दुपारी १.३० वाजता ते अयोध्येमध्ये जातील. येथे दुपारी ३.३० वाजता ते पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.