मुंबई : शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला परवानगी नाकारली आहे. या मैदानावर मेळावा घेतल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता असल्याने महापालिकेने ही परवानगी नाकारली आहे. मात्र, शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेणार, असा निर्धार शिवसेनेने केला आहे. यावरून आता मनसेने शिवसेनेला डिवचलं आहे.

“कोणी मैदान देतं का मैदान, अशी म्हणण्याची वेळ शिल्लक सेनेवर आली आहे. ज्यांनी गेली अडीच वर्षे फेसबूकवर राज्य कारभार पाहिला, त्यांना आता टोमणे मेळावासुद्धा शिवतीर्थावर घेता येणार नाही. हा मेळावा फेसबूकवर घेण्याची वेळ शिल्लक सेना प्रमुखांवर आली आहे. महाराष्ट्र टोमणे मेळाव्याच्या माध्यमातून चला हवा येऊ द्याचा प्रयोग आणि मनोरंजनाला मुकेल,” असा टोमणा मनसेचे नेते गजानन काळे यांनी मारला आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे घाबरलेल्या अवस्थेत…”, चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले, “भाजपा योग्यवेळी उत्तर देईल”

शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी

दरम्यान, मुंबई महापालिकाने कायदा-सुव्यवस्थेचा कारण देऊन परवानगी नाकारली आहे. मात्र, यासाठी शिवसेनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २२ ऑगस्टला अर्जकरून परवानगी न मिळाल्याने शिवसेना न्यायालयात धाव घेतली. ‘अर्ज करून ७२ तासांत परवानगी मिळणे अपेक्षित होते. पण, एक महिना होऊनही पालिकेने परवानगी दिली नाही,’ असे शिवसेनेने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. त्यावर आता शुक्रवारी २३ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.