Dombivali Marathi Girl Viral Video : डोंबिवलीत शॉरमा विकणाऱ्या एका मराठी मुलीच्या हातगाडीवर सातत्याने कारवाई केली जात असल्याच्या रागातून संबंधित तरुणीने व्हिडिओ प्रसारित केला होता. तिचा व्हिडिओ व्हायरल होऊन थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत जाऊन पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांना याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याच्या सूचना करताच अविनाश जाधव थेट डोंबिवलीत पोहोचले आणि संबंधित तरुणीची व्यथा जाणून घेतली.
तरुणीने अविनाश जाधव यांना काय सांगितलं?
डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि अविनाश जाधव यांनी या संबंधित तरुणीची भेट घेतली. तिने सांगितलं की इथे फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. अनेक परप्रांतीय येथे व्यवसाय करत असतानाही फक्त माझ्याच दुकानावर कारवाई केली जाते. मी दररोजचे ३०० रुपये देते, तरीही पालिकेकडून माझी गाडी उचलली जाते. मी दोन वर्षांपासून येथे स्ट्रगल करते. नवरात्री, दिवाळी, गणपतीतून स्टॉल बंद करते. पोलीस, केडीएमसीवाले येऊन पैसे घेऊन जातात आणि वर मलाच विचारतात की तुला येथे स्टॉल लावायला परवानगी मिळाली आहे का?”, अशी आपबिती तिने सांगितली.
मला राज ठाकरेंनीच पाठवलं
ती पुढे म्हणाली, “माझी एकच विनंती आहे की परप्रांतीयांना, दिव्यांगांना टपरी मिळते ना, मग मलाही येथे टपरी टाकून द्या. त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावून द्या.” त्यावर अविनाश जाधव म्हणाले की, “मलाही राज ठाकरेंनी तुला भेटायला पाठवलं आहे. तू गाडी टाक, बाकी मी बघतो. काही अडचण आलीतर इथे आपले पदाधिकारी आहे, यापेक्षाही अडचण आली तर मी स्वतः येईन. बाकी आयुक्तांशी साहेब बोलतील.
आता रडायचं नाही…
“आता रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस रडत नाही. काही अडचण आली तर आपले पदाधिकारी आहेत, नाहीतर मला फोन करायचा मी ठाण्यातून अर्ध्या तासांत येईन. पण यापुढे तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे”, असा दिलासाही त्यांनी या तरुणीला दिला.
