MNS Raj Thackeray Social Media Post: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर एक दीर्घ पोस्ट लिहित बाळासाहेब ठाकरेंच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पोस्टमध्ये त्यांनी वर्तमान राजकारणावर खंत व्यक्त केली. तसेच “आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल”, असे विधान त्यांनी केले. या विधानाचा संबंध कल्याण-डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत जोडला जात आहे. आता यावर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपली भूमिका मांडली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या पाच नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ केला आहे. यामुळे आता भाजपाला वगळून शिंदेंच्या सेनेचा महापौर होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मनसेच्या या भूमिकेनंतर ठाकरे बंधूंच्या युतीचे काय? मनसे इतर ठिकाणी कोणती भूमिका घेणार? असे काही प्रश्न निर्माण झाले होते.

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी येणाऱ्या शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या नेत्यांना हाच प्रश्न विचारला जात आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनाही याबाबत विचारण्यात आले. तसेच कल्याण-डोंबिवलीत मनसेने दाखवलेली याचिका मुंबईतही दाखवली जाणार का? असा प्रश्न नांदगावकर यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

राज ठाकरेंच्या लवचिकता या विधानाबाबत बाळा नांदगावकर यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, लवचिकता ही वेळप्रसंगी मराठी माणसाच्या हितासाठी घ्यावी लागते. राज ठाकरे त्याप्रमाणे भूमिका घेत असतात.

मुंबईमध्येही अशी लवचिक भूमिका घेतली जाईल का? असा प्रश्न विचारला असता बाळा नांदगावकर म्हणाले, याबाबत निर्णय घेण्यासाठी दोन्ही भाऊ समर्थ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे, यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते आपली भूमिका जाहीर करतील. तसेच कल्याण-डोंबिवलीच्या निर्णयाबाबत मी काहीही विधान करू शकत नाही. पक्षप्रमुख याबाबत निर्णय घेतील.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “आज निष्ठा सहज विकल्या जातात. तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालं आहे. आज राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक, भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्या यावर मोजले जाते.”