महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे नुकताच पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी ते मनसेचे सरचिटणीस किर्तिकुमार शिंदे यांच्यावर रागावल्याचा बघायला मिळालं. मात्र, याचं कारण काय होतं हे स्वत: किर्तीकुमार शिंदे यांनी सांगितलं आहे. ‘लोकसत्ता.कॉम’शी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे मारण्याची धमकी; म्हणाले, “राणे कुटुंबाविरोधात…”
नेमकं काय घडलं?
यासंदर्भात बोलताना किर्तिकुमार शिंदे म्हणाले, गुरुवारी (२ फेब्रुवारी) रोजी आम्ही सांगली दौरा आटपून रात्री उशीरा पंढरपूर सर्किट हाऊसवर पोहोचलो होतो. रात्रीचे १२ वाजायला जेमतेम १०-१५ मिनिटं बाकी होती. सर्किट हाऊसवर पोहोचताच अमित ठाकरे तातडीने त्यांच्या त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि मी बाहेर इतर पदाधिकाऱ्यांचे निवास आणि भोजनाचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त झालो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर ‘अमित साहेब कॉलिंग’ ही अक्षरं उमटली. मी कॉल उचलला. समोरून रागावलेल्या आवाजात अमित ठाकरे म्हणाले, “कुठे आहात तुम्ही? इथे सोलापुरात काहीच योग्य व्यवस्था झालेली नाही. मी आताच्या आता मुंबईला निघतोय” इतकंच बोलून त्यांनी फोन ठेवला.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, अमित ठाकरेंचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. अमित ठाकरे माझ्यावर रागावले होते आणि दौरा अर्धवट सोडून निघून जायचं बोलत होते. मी धावत त्यांच्या रूममध्ये गेलो. सगळेजण मान खाली घालून उभे होते. मला काही समजेना. अमित ठाकरे पुन्हा एकदा चढ्या आवाजात म्हणाले, “हे काय चाललंय? तुमचा वाढदिवस (३ फेब्रुवारी) आहे ना? मग इथे केक का नाही?” त्यांचं हे वाक्य ऐकलं आणि सगळा ताण पळून गेला.
दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी मनसे नेते किर्तिकुमार शिंदे यांचा वाढदिवस होता. मात्र, अमित ठाकरेंनी केलेल्या मस्करीमुळे शिंदे यांना चांगलाच घाम फुटल्याचं बघायला मिळालं.