Raj Thackeray Speech Garjana Morcha : देशातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गैरप्रकार केल्याचं समोर आल्यानंतर देशभर जनक्षोभ उसळला आहे. ठिकठिकाणी आंदोलनो होत असून ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे. दरम्यान, आज ठाकरे बंधूंनीही मुंबईत गर्जना मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या. त्यातील पहिली मागणी म्हणजे आता झालेली एसआयआर प्रक्रिया रद्द करा. राज ठाकरे म्हणाले, “जो आतापर्यंत एसआरआय झाला तो रद्द झाला पाहिजे.” यावेळी त्यांनी माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांनी नोंदवलेलं मतही यावेळी सांगितलं.
एसआयआर रद्द झाला पाहिजे
राज ठाकरे म्हणाले की, माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंग यांच्यामते, स्पेशल रिव्हिजन ही अपवादात्मक परिस्थितीत कारणे लेखी नोंदवून आणि विशिष्ट मतदारसंघापुरता करता येते. संपूर्ण भारतात एसआयआर करणे बेकायदेशीर आहे. याबाबत कायद्यातच तरतूद नाही. समजा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली, पूर, भूकंप, स्थलांतर, खूप दुबार नावं आहेत, अशा तक्रारी आल्या तर एसआयआर केलं जाऊ शकतं. त्यामुळे आता जे प्रकरण सुरू आहे, ते बेकायदेशीर आहे. विधानसभेवेळी मतदार वाढवायचे आणि आता एसआयआरमध्ये दोन कोटी लोक बाहेर काढले. हे आमचे मतदार आहेत? ते कोण आहेत? म्हणून सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की एसआयआर रद्द झाला पाहिजे.”
बॅलेट पेपरवर मतदान घ्या
दुसऱ्या मागणीबाबत राज ठाकरे म्हणाले, “या देशातील व्होटिंग मशिन बंद होऊन बॅलेट पेपरवर मतदार झालं पाहिजे. या दोन गोष्टी झाल्या तर दूध का दूध पाणी का पाणी होईल. उद्या कोणाचीही सत्ता येईल, काहीही फरक पडत नाही.”
