राज्यात विविध घडामोडी घडत असून त्यावर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन ओळींची एक सूचक पोस्ट केली आहे. मात्र, त्यांनी संबंधित पोस्ट कोणत्या घटनेवरील प्रतिक्रिया म्हणून केली आहे, याबाबत खुलासा आलेला नाही.

राज्यातील वा देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियाचा आधार घेतात. सरकार वा संबंधित यंत्रणेवर टीका करण्याकरता ते सूचक पण लांबलचक पोस्ट लिहितात. त्यांच्या पोस्टना तितकाच तुफान प्रतिसादही मिळतो. दरम्यान, आज त्यांनी केवळ २ ओळींचीची पोस्ट लिहिली असून त्यांचा इशारा नेमका कोणावर आहे, हे समोर आलेलं नाही.

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, त्यांचा रोख कोणावर आहे हे समजू शकलेलं नाही.

महाराष्ट्रात काय घडतंय?

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी सीबीआयने केलेल्या चौकशीतून युवा आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं आहे. एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंसह अनेकांची नावं असल्याचा खुलासा दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी केलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे सध्या रडारवर आहेत. तर, दुसरीकडे मराठा आंदोलन अधिक आक्रमक झालं आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईतील आंदोलनासाठी अर्ज केला असून कोणत्याही परिस्थितीत ते मुंबईत परतणारच आहेत, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.

तसंच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केलेलं एक वक्तव्य तुफान चर्चेत आणि वादाच्या केंद्रस्थानी आलं आहे. महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे, असं अमित शाहा म्हणाले आहेत. त्यामुळे मराठीचा मुद्दा सातत्याने लावून धरणाऱ्या नेत्यांनी अमित शाहांवर टीका केली आहे.