माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुप्त भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर मनसे आणि भाजपा एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या ट्वीटनंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे. माझं वैयक्तिक राजकीय निरीक्षण म्हणजे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्वाची आहे, मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

माझं वैयक्तिक राजकीय निरीक्षण “सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बेरीज महत्वाची. नाहीतर काँग्रेस शिवसेने बरोबर गेली नसती आणि भाजपनी राष्ट्रवादी बरोबर दोन दिवसांची सोयरीक केली नसती,” अशा आशयाचं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. येत्या २३ जानेवारी मनसेच्या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनातील मनसेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीदेखील भाजपा मनसे युतीचे संकेत दिले होते.

कार्यपद्धती बदलल्यास विचार : फडणवीस
“मनसे आणि भाजपा एकत्र येण्याचं कोणतीही चिन्ह नाही. त्यांच्या आणि आमच्या विचारात अतंर आहे. आणि जोपर्यंत विचार आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येऊ शकत नाही. त्यांचे विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात विचार करु शकतो,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं.

“आज तरी सध्या अशी कोणतीच शक्यता नाही. आमचा व्यापक दृष्टीकोन आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने सर्व घटकपक्षांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे. त्यामुळे आज तरी अशी परिस्थिती दिसत नाही. भविष्यात ते व्यापक विचाराने चालणार असतील तर त्यावेळी विचार केला जाईल,” असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.