मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना 'बिनशर्ट' पाठिंबा देणाऱ्यांनी महिन्याभरात त्यांची भूमिका बदलली, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या टीकेला आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे? “आमचं मराठी माणसावर, महाराष्ट्रावर प्रेम आहे की नाही, याचं प्रमाणपत्र संजय राऊतांकडून घ्यायचं का? आणि हा अधिकार संजय राऊतांना कोणी दिला? मुळात आम्ही २२५ ते २५० जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याने संजय राऊतांचा पक्ष घाबरला आहे. त्यामुळे अशाप्रकारे विधानं करून मनसेला बदनाम करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत”, असं प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिलं. हेही वाचा - राज ठाकरेंच्या लाडका भाऊ अन् बहिणीच्या टीकेवरून जयंत पाटलांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "… “२०१९ पूर्वी अमित शाह, नरेंद्र मोदी हे शत्रू नव्हते का?” “खोट्या नरेटीव्हला बळी पडायला आम्ही भाजपा नाही, संजय राऊतांनी आम्हाला शहाणपणा शिकवण्यापूर्वी आधी स्वत:च्या हृदयात झाकून बघावं, सत्ता मिळवण्यासाठी आपण काय घाणेरड्या खेळी केल्या, हे त्यांनी आठवून बघावं, असेही संदीप देशपांडे म्हणाले. तसेच “ ”२०१९ पूर्वी ज्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या मांडीवर बसून तुम्ही निवडणूक लढवली, तेव्हा ते महाराष्ट्राचे मित्र होते की शत्रू? वरळीत केमच्छो वरळीचे पोस्ट लावताना तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का?” असा प्रश्नही त्यांनी संजय राऊतांना विचारला. “…तर संजय राऊतांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही” “संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला मराठी माणसांची इतकी काळजी होती, तर २५ वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेने किती मराठी माणसांना कामं दिलं? मुळात त्यांनी किती गुजराती कंत्राटदारांना काम दिलं, याची यादी आमच्याकडे आहे, त्या यादीतली नावं सांगितली तर संजय राऊतांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही”, असेही संदीप देशपांडे म्हणाले. हेही वाचा - मनसेची स्वबळाची तयारी… संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं होतं? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. यावरून संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली होती. “राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत. ते बराच काळ तिकडे होते. त्यामुळे राज्यात काय सुरू आहे, हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे शत्रू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना 'बिनशर्ट' पाठिंबा दिला होता. आता फक्त एका महिन्यात त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे, हे आश्चर्यकारक आहेत”, असं संजय राऊत म्हणाले होते. याशिवाय “मुळात राज ठाकरेंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. मात्र, महाराष्ट्रात अपशकून घडवून आणण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत का? हे महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी पक्षांना बघावं लागेल. खरं तर यावर जास्त काही बोलण्यात अर्थ नाही. काही पक्ष आणि संघटना या महाराष्ट्राविरोधी निर्णय घेण्यासाठीच स्थापन झाल्या आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली होती.