scorecardresearch

“खोटी आश्वासनं की…”; राज आणि उद्धव ठाकरेंची तुलना करत मनसे म्हणाली, “निवड…”

गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

Raj Uddhav
ट्विटरवरुन साधण्यात आला निशाणा (फाइल फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये २ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजीपार्कवर मनसेचा मेळावा पार पडणार आहे. मात्र या मेळाव्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. राज्य सरकारच्या आणि विशेषत: शिवसेनेच्या अनेक धोरणांवर आक्षेप घेत मनसेकडून वारंवार टीका होत असतानाच आता गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं पुन्हा एकदा टोलनाक्यांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेला लक्ष्य केलंय. मनसेनं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्यांची तुलना केलीय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटवरुन राज ठाकरेंच्या जुन्या भाषणातील एक व्हिडीओ आणि उद्धव ठाकरेंच्या निवडणुक प्रचारासभेदरम्यानचा व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे, “महाराष्ट्रभर जे टोलनाके बसवले गेले, त्यावरुन महाराष्ट्रातील जनतेची जी लूट सुरु होती त्याविरोधात मनसेनं आंदोलन केलं. या महाराष्ट्रातील ७८ टोलनाके बंद केले. हे मनसेच्या आंदोलनानंतर झालं,” असं सांगताना दिसत आहे. तसेच पुढे बोलताना राज ठाकरे, “मल विचारतायत पण मग इतर टोलनाक्यांचं काय. अरे गधड्यांना यांना (सत्ताधाऱ्यांना) विचारा ना. यांच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करु,” असं म्हणताना दिसतायत.

राज यांच्या या व्हिडीओनंतर उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभेमधील व्हिडीओची क्लिप दाखवण्यात आलीय. या व्हिडीओत, “हे सरकार आल्यानंतर, वचननाम्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करणार,” असं उद्धव ठाकरे सांगताना दिसतंय. या व्हिडीओच्या पोस्टवर, “वचननाम्यात दिलेल्या “टोलमुक्त महाराष्ट्र’ या वचनाचं काय झालं?” असा प्रश्न विचारण्यात आलाय. तर खालील बाजूस, “महाराष्ट्रात कोणतीही सत्ता नसताना मनसेने ७८ टोल नाके बंद केले,” असं वाक्य लिहिलेलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना संदीप देशपांडेंनी, “खोटी आश्वासनं की प्रामाणिक सत्य निवड तुमची,” अशी कॅप्शन दिलीय.

दरवर्षी राज ठाकरे गुढीपाडव्यानिमित्त शिवाजीपार्कमध्ये मनसेचा मेळावा घेतात. यंदाही हा मेळावा मोठा उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी मनसेनं तयारी सुरु केलीय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns leader slams cm uddhav over toll issue shares old clip of raj thackeray scsg

ताज्या बातम्या