रस्त्यांवर सभा घेण्यासाठी संमती द्या अशा आशयाचं पत्र मनसेने निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. परतीचा पाऊस लांबल्याने मैदानांवर मातीचा चिखल होतो आहे. अशा स्थितीत सभेसाठी आरक्षित मैदानांवर प्रचारसभा घेणं अशक्य झालं आहे. त्यामुळेच शहरांमधील रस्त्यांवर जाहीर सभा घेण्यास निवडणूक आयोगाने परवानगी द्यावी, असं पत्र मनसे तर्फे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल पुण्यात मनसेच्या पहिल्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा एका शाळेच्या मैदानावर होणार होती. मात्र, सभेच्या वेळेआधीच पुण्यात जोरदार पाऊस झाल्याने या मैदानात सर्वत्र चिखल झाला होता. त्यामुळे नाईलाजाने राज ठाकरेंना ही सभा रद्द करावी लागली. त्यानंतर आज मुंबईत सायंकाळी सहा वाजता सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये पहिली सभा आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या सभांवरही पावसाचे सावट असल्याने मनसे कार्यकर्ते आणि खुद्द राज ठाकरे चिंतेत आहेत.

या आस्मानी संकटासमोर हतबल झालेल्या राज ठाकरे यांना अखेर निवडणूक आयोगाला पत्र लिहावे लागले आणि मैदानात सभा घेण्याऐवजी रस्त्यांवर सभा घेण्यासाठी परवानगी मागावी लागली. मनसेच्या या पत्रावर अद्याप निवडणूक आयोगाकडून कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही.