विविध सवलतीपासून दूर असलेल्या धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. या मागणीला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणा देत मनसेच्या कार्यालयापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.धनगरऐवजी धनगड अशा शब्दामुळे धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र भाग चार २००७,२००९ च्या वार्षिक अहवाल व केंद्र शासनाच्या जनजाती मंत्रालयाच्या गेल्या दहा वर्षांचे वार्षिक अहवाल महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आल्यानंतरही धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये घटनेनूसार समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे आजूनही समाजावर अन्याय होत आहे. असे निवेदनात नमूद आहे. या मोर्चात जिल्हा सचिव डॉ. शरद काळे देवेन खोत, धनगर समिती संपर्क प्रमुख रामभाऊ जुमडे, मल्हार सेना उपध्यक्ष नथ्थुजी चाटे, धनगर समाज जिल्हाध्यक्ष रवी करणकार, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बरबडे आदींचा सहभागी झाले होते.