महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर हा दिवस ‘हुतात्मा स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या १०७ जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो. आजच्या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. यावेळी मनसेनं ‘एक्स’ खात्यावर पोस्ट लिहून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील संघर्षाची आठवण करून दिली आहे.
मनसेनं ‘एक्स’वरील (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये लिहिलं, “राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. हा निर्णय कळल्यापासून मुंबईकर नाराज होते. मुंबईतील मराठी समाजमन संतापले होते. फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. गर्दी वाढू लागली. कामगार आणि पांढरपेशांचा मोर्चा निघाला. सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली. फोर्ट परिसरातील जमावबंदी आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले. अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरू केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमार झाला तरी गर्दी हटत नाही हे बघून पोलिसांनी गोळीबार केला.”




“मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घाला, असा आदेश दिला. या आदेशाचे विपरित परिणाम झाले. गोळीबारात १०७ जण हुतात्मा झाले आणि वातावरण बदलले. या घटनेचा परिणाम झाला, अनेक मराठी पुढाऱ्यांनी मागणी लावून धरली, कामगारांनी-शेतकऱ्यांनी निकराची झुंज दिली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या राजधानी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळविला. ज्या १०७ जणांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या हुतात्म्यांना यावतचंद्र दिवाकरौ आपण नमन करायला हवं” असंही मनसेनं पोस्टमध्ये म्हटलं.