scorecardresearch

मराठी भाषा दिन जोरदार साजरा करा, राज ठाकरेंचं पत्र; म्हणाले “या भाषेचा वचक संपूर्ण देशात…”

“मराठी भाषा गौरव दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्दत आपणच महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरु केली”

MNS President Raj Thackeray, Marathi Bhasha Din, Marathi Language Day, Raj Thackeray Letter to Party Workers,
"मराठी भाषा गौरव दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्दत आपणच महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरु केली"

मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. यावेळी त्यांनी पत्रातून कार्यकर्त्यांना मराठी भाषा दिन जोरदार साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. मराठी भाषा गौरव दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्दत आपणच महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरु केल्याची आठवण यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली आहे.

पत्रात काय म्हटलं आहे –

मनसेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्धेशून लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतायत की, “२७ फेब्रवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून साजरा करतो. गौरव दिवस पूर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये होता, परंतु तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याची पद्दत आपण, आपल्या पक्षाने सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरु केली”.

“हा आपल्या भाषेचा गौरव दिवस आहे. तो त्याच जोशात, दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक गावात, प्रत्येक भागात, प्रत्येक प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा,” अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे.

“आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली, परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की, मराठी भाषकांनी या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. या भाषेचा वचक संपूर्ण देशात होता. ज्या भाषेने कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत. समाजुसधारक दिले त्याच भाषेचा गौरव दिवस आहे. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरुंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील अशी किती नावं घ्यायची? पण या सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच! अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा,” असं राज ठाकरे पत्रात म्हणाले आहेत.

पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “यासाठी तुम्हाला विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक मराठी माणसाला कळलं पाहिजे की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जितका भव्य करता येईल तितका करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा. संपूर्ण राज्या या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण करा”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns president raj thackeray letter to party workers to celebrate marathi bhasha din sgy

ताज्या बातम्या