scorecardresearch

राज ठाकरेंनी दिली कोथरूडमधून लढण्याची ऑफर; भाजपा आमदाराचा गौप्यस्फोट

काल भाजपाची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

राज ठाकरे

मंगळवारी भाजपा आणि शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये काही विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. तर काही विद्यमान आमदारांना पत्ता कट करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरूडमधून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या ठिकाणच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता मात्र कापण्यात आला. त्यानंतर मेधा कुलकर्णी या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. परंतु आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. तसंच यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोट केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्याला चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात आमचं पण ठरलंय, कसबा विधानसभा मतदारसंघात बाहेरचा उमेदवार नको, अशा आशयाचे फलक लावण्यात आला होता. या फलकबाजीला काही तास होत नाही तोच कोथरूड भागात दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे. आम्ही कोथरूडकर, अशा आशयाची पोस्टरबाजी करण्यात आल्याचं पहायला मिळालं होतं. कोथरूडमधून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्यानं ही फलकबाजी करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी भाजपाच्या पहिल्या यादीत चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी या नाराज असल्याचं म्हटलं जात होतं.

दरम्यान, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांनी आपल्याला फोन करून कोथरूडमधून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. परंतु आपण त्याला नकार दिल्याचे त्या म्हणाल्या. तसंच आपण भाजपासोबतच राहणार असून चंद्रकांत पाटील यांना मोठ्या फरकाने निवडून आणू आणि पक्षविरोधी काम करणार नाही, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात विरोधी पक्ष एकच उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच आघाडीकडून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आली असून त्यांनी या ठिकाणाहून विश्वंभर चौधरी यांना निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. परंतु त्यांच्याकडून अद्याप होकार देण्यात आलेला नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns president raj thackeray offers pune kothrud bjp mla medha kulkarni to contest against chandrakant patil %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c %e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%82