विदर्भवाद्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पोस्टर्स जाळल्यानंतर मनसेनेही विदर्भवाद्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मनसेचे नागपूरमधील नेते हेमंत गडकरी यांनी विदर्भवादी संघटनेचे झेडे जाळत विदर्भवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनार्थ मुंबईत अॅढ वामन चटप आणि डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्यातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मनसेचे नेत्यांनी ही पत्रकार परिषद उधळून लावली होती. याचे पडसाद नागपूरमध्येही उमटले.  वेगळया विदर्भाविरोधात भूमिका घेणाऱ्या मनसेसह शिवसेनेचा निषेध म्हणून विदर्भवाद्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे नागपूरमध्ये बुधवारी पोस्टर जाळले. त्यामुळे आता विदर्भवादी आणि मनसे यांच्यात राजकारण रंगण्याची दाट शक्यता होती.

संध्याकाळी साडे चारच्या सुमारास व्हरायटी चौकात मनसेचे स्थानिक नेते हेमंत गडकरी यांच्यासह कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांनी विदर्भवादी झेंडा जाळला. तसेच विदर्भवाद्यांच्या पोस्टर्सही फाडले. विदर्भवादी नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यापुढे राज्यात कुठेही विदर्भवादी नेत्यांची पत्रकार परिषद होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, भाजप आमदार आशिष देशमुख यांनी राज ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले आहे. मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतो, राज ठाकरे यांच्यात हिंमत असल्यास त्यांनी काटोलमध्ये येऊन माझ्याविरुद्ध निवडणुकीत जिंकून दाखवावे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी दुध का दुध आणि पानी का पानी करण्यासाठी काटोलमधून निवडणूक लढवावी. मी विदर्भाच्या बाजूने आणि त्यांनी महाराष्ट्राच्या बाजूने मैदानात उतरावे. त्यानंतर जनताच योग्य ते उत्तर देईल, असे आशिष देशमुख यांनी म्हटले. त्यामुळे मनसे विरुद्ध भाजप असा संघर्षही निर्माण होण्याची चिन्हे आहेत.