scorecardresearch

“ते संजय राऊत किती बोलतायत?”, राज ठाकरेंचा खोचक शब्दांत टोला; म्हणाले, “कॅमेरा लागला की हे…!”

राज ठाकरे म्हणतात, “शिव्या वगैरे काय देताय? कुठली भाषा आहे ही? राजकारणात येणाऱ्या पिढ्या काय पाहातायत. त्यांना वाटेल राजकारण असंच असतं.”

raj thackeray mocks sanjay raut
राज ठाकरेंनी केली संजय राऊतांची नक्कल!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोळावा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात आला होता. गेल्या १६ वर्षांत पहिल्यांदाच मुंबईबाहेर मनसेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तुफान फटकेबाजी केली. यावेळी राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केलं. संजय राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला.

“कॅमेरा लागला की हे सुरू होतात”

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी संजय राऊत पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने बोलतात, त्याची नक्कल करून दाखवली. “ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात त्यांची एक अॅक्शन असते. कॅमेरा लागला की हे सुरू. कॅमेरा हटला की पुन्हा नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात?” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरेंनी केली राज्यपालांची नक्कल; म्हणाले, “..तेव्हा असं वाटलं राज्यपाल लगेच माझा हातच बघायला लागतील”!

“डोळे, भुवया उडवून बोलणं… बोलणं हा प्रश्न नाही. आपण किती बोलतो? आपण काय बोलतो? कसं बोलतो? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?” असं देखील राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray : “असं वाटतं मोदींना सांगावं दर महिन्याला दोन दिवस…”, पुण्यात राज ठाकरेंची फटकेबाजी!

“राज्यात काय चाललंय कळतच नाही”

दरम्यान, राज्यात नेतेमंडळींकडून वापरण्यात येणारी भाषा गेल्या काही दिवसांत चर्चेचा विषय ठरली होती. यावरून देखील राज ठाकरेंनी टीका केली. “राज्यात काय चाललंय काही कळत नाही मला. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, विरोधी पक्ष म्हणतो आम्हाला संपवायला निघाले. मग उरलं कोण? उरलो आपण. असे सत्ताधारी-विरोधक बघितले नाहीत कधी. वीट आलाय आता. शिव्या वगैरे काय देतायत, कुठली भाषा आहे. राजकारणात येणाऱ्या पिढ्या काय पाहातायत. त्यांना वाटेल राजकारण असंच असतं. हे जर विधानसभेत बोलत असतील, तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषदेला काय बोलत असतील. तोंडाला येईल ते बोलायचं”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns raj thackeray targets sanjay raut shivsena mocks on press conference pmw

ताज्या बातम्या