scorecardresearch

हिंदुत्वावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रत्युत्तर; म्हणाले “शोलेमधल्या आसरानीसारखे…”

“आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज पार पडणार असून यावेळी आपल्या भाषणादरम्यान कोणावर निशाणा साधतात याची महाराष्ट्राला उत्सुकता आहे. तसंच यावेळी मशिदींवरील भोंग्यासंबंधी काय भूमिका मांडतात हेदेखील पहावं लागणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हिंदुंमध्ये फोडाफोड आणि महाराष्ट्रात मराठी-अमराठी भेदभाव ही भाजपाची चाल असल्याचा आरोप केला असून महाराष्ट्रभर फिरणार असल्याची ग्वाही दिली आहे. तसंच याआधी त्यांनी हिंदुत्वावरुन राज ठाकरेंवरही निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला मनसेने उत्तर दिलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “मुख्यमंत्र्यांची अवस्था शोलेमधल्या आसरानीसारखी आहे. अर्धे मनसेवर तुटून पडा, अर्धे भाजपावर तुटून पडा आणि आम्ही घऱात बसतो अशी अवस्था आहे,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

“बिनकामाचे भोंगे….,”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले “मी काडीची किंमत देत नाही”

“आम्ही सर्वांनी गुढीपाडव्याच्या सभेआधी राज ठाकरेंची ही सभा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरेल असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे राज ठाकरेंच्या या सभेतनंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आजr सभाही ऐतिहासिक सभा असेल. कारण या सभेकडे फक्त संभाजीनगर, महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे कोणते मुद्दे मांडणार याची उत्सुकता सर्वांना आहे,” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हिंदुंमध्ये फोडाफोडीचा भाजपचा डाव; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप; १४ मे रोजी मुंबईत तर ८ जूनला औरंगाबादेत सभा

३ तारखेच्या अल्टिमेटमसंबंधी बोलताना ते म्हणाले की, “राज ठाकरे कायद पाळा असं सांगत असून सरकारने तो पाळला पाहिजे. आम्हाला धमक्या देण्यापेक्षा जे लोक कायदा पाळत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत या हिंदुत्ववादी सरकारने दाखवली पाहिजे”.

“राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता आम्हालाही आहे. ते काय बोलणार हे आधी कोणीच सांगू शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्रभर दौरा

शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे, हे दाखवण्यासाठी शिवसंपर्क अभियान आहे. इतर पक्षांनी संपर्क आधीच सुरू केला आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. शिवसेना त्यांच्यासाठी काय करत आहे याबाबत जागरूकता निर्माण करा. तुमच्यासाठी धोका पत्करून मी शस्त्रक्रिया केली आहे. आता त्यातून बरा होत असून १४ मे रोजी मुंबईत तर ८ जूनला मराठवाडय़ात सभा आहे. आता मी महाराष्ट्रभर फिरणार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns sandeep deshpande on maharashtra cm uddhav thackeray hindutva sgy