महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानातील मनसेच्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडताना मागील काही दिवसांपासून भाजपाने लावून ठरलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घातला. मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू असं राज म्हणाले. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा थेट इशारा देत सूचक विधान केलं. याच इशाऱ्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उत्तर दिलं असून थेट गृहमंत्र्यांनाच आव्हान दिलंय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

“सामाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय,” असं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना विचारण्यात आलं असता गृहमंत्र्यांच्या या इशाऱ्यावरुन देशपांडे यांनी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा सल्ला दिलाय. “गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबावायचा हे शिकलं पाहिजे. माझी सन्माननिय दिलीप वळसे-पाटील यांना विनंती आहे की जे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्या आदेशाचं पाहिलं पालन करा,” असं देशपांडे म्हणाले. तसेच पुढे बोलताना देशपांडे यांनी, “न्यायालयाने भोंगे खाली उतरवण्याचे आदेश दिलेत त्याचं पालन करा मग आम्हाला धमक्या द्या. आम्ही आहोतच आम्ही कुठे जाणार आहोत. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही,” असंही देशपांडे म्हणाले.

नक्की वाचा >> “शरद पवारांना जातीयवादी म्हणणारे राज ठाकरे…”; अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

तसेच पुढे बोलताना, “असे धमकी देणारे खूप गृहमंत्री आम्ही बघितले आहेत. आम्हाला त्यांचा फरक पडत नाही. आमची जी मागणी आहे ती कायद्याचं राज्य यावं, कायद्याचं पालन व्हावं ही आहे. त्याचा त्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे,” असं देशपांडे यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण

“गृहमंत्र्यांनी आम्हाला दम देण्यापेक्षा कायद्याचं पालन करावं. सन्माननिय उच्च न्यायालयाने काय भूमिका घेतलीय की, भोंगे उतरले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला दम देणार, आमच्यावर कारवाई करणार. कारवाईला कोण महाराष्ट्र सैनिक घाबरत नाही. आम्हाला काय फरक पडत नाही त्या कारवाईचा. मूळात विषय असाय की आम्ही सांगतोय कायद्याचं पालन करायचा. ते पहिलं गृहमंत्र्यांनी करावं आणि मग आम्हाला दम द्यावा,” असं देशपांडे यांनी पक्षाची भूमिका मांडताना म्हटलंय.

नक्की वाचा >> “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे…”; पवारांवर राज यांनी केलेल्या टीकेवर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राज यांच्या आवहानानंतर मुंबईच्या घाटकोपरमध्ये मनसे नेते महेंद्र भानुशाली यांनी रविवारी कार्यालयाबाहेर भोंगे लावले. यानंतर मुंबई पोलिसांनी या नेत्यावर कारवाई करत भोंगे उतरवले आहे. पोलिसांनी मनसे पदाधिकाऱ्याला समज देऊन भोंगे काढले. तसेच ताब्यात घेऊन चिरागनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.