राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्ताने हनुमान चालीसा पठणाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यात यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी ठाण्यातल्या सभेमध्ये पुन्हा एकदा हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्याचेच पडसाद मुंबईत पाहायला मिळत आहेत. एकीकडे मनसेकडून हनुमान चालीसा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं असताना दुसरीकडे शिवसेनेकडून देखील दादरमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटरवरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

“पवारांची परवानगी घेतली आहे का?”

याआधी सकाळी दादरमध्ये बोलताना संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये बोलताना शिवसेनेला टोला लगावला होता. “राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी देखील महाआरतीचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हीच भूमिका त्यांनी ३ तारखेनंतर देखील कायम ठेवावी. आज महाआरती करत आहात. पण शरद पवारांची यासाठी परवानगी घेतली आहे का हे देखील तपासून घ्यावं. नाहीतर पुन्हा महाआरती करतील आणि ३ तारखेनंतर पळून जातील”, असं संदीप देशपांडे यावेळी म्हणाले.

“आता केंद्रानंच पुढाकार घ्यावा”, मशिदींवरचे भोंगे उतरवण्यासाठी मनसेचं थेट अमित शाह यांना पत्र!

“बोंब ठोकणाऱ्यांची फरफट”

यानंतर आता ट्विटरच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे. “मनसे संपली अशी बोंब ठोकणाऱ्यांची आज चांगलीच फरफट झाली. नास्तिकांच्या पक्षाला पहिल्यांदा हनुमान जयंती साजरी करावी लागली, तर नव्याने पुरोगामी झालेल्या पक्षाला महाआरती. राज साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने मशिदीवरील भोंगे आणि त्याच्या समर्थनार्थ तसेच विरोधातील भूमिका यावरून राज्यात राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे.