scorecardresearch

“…म्हणून राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात”; ‘शरद पवाराला शरम वाटत नाही?’ म्हणणारा बाळासाहेबांचा Video शेअर करत मनसेचा टोला

“…म्हणजे हे ‘महाशय’ स्वतःला बाळासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत का?” असा प्रश्न मनसेनं विचारलाय.

MNS Shivsena Raut
फेसबुकवरुन व्हिडीओ शेअर करत साधला निशाणा (फाइल फोटो)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या आक्रमक भूमिकेवरुन सध्या राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता मनसेनं थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणामधील संदर्भ देत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राचा व्हिडीओ शेअर करत मनसेनं, “…म्हणून संजय राऊतांना राज ठाकरे ‘लवंडे’ म्हणतात” या मथळ्याखाली एक पोस्ट शेअर केलीय.

नक्की वाचा >> “तुमचे दादा, साहेब आणि ताईंना कधीतरी…”; अमोल मिटकरींना मनसेचं खुलं आव्हान

राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या १२ एप्रिलच्या सभेमध्ये संजय राऊत यांनी गुढीपाडव्याच्या भाषणावरुन केलेल्या टीकेचा सामाचार घेताना लवंडे असा शब्द वापरला होता. जिकडून सत्ता जाईल त्या बाजूने पडणार पत्रकार अशा अर्थाने त्यांनी हा शब्द आपल्या आजोबांचा म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंचा संदर्भ देत भाषणात वापरला होता. त्यावरुनच आता मनसेनं निशाणा साधलाय. “बाळासाहेबांची मशिदीवरील भोंग्या बाबतीतील चित्रफीत पाहिल्यावर आपली बोलती बंद झाल्याने “मला बाळासाहेबांचे पूर्वीचे व्हिडिओ दाखवून प्रश्न विचारू नका” असे पत्रकारांना संजय राऊत म्हणाले. म्हणजे हे ‘महाशय’ स्वतःला बाळासाहेबांपेक्षा मोठे समजायला लागले आहेत का?” असा प्रश्न मनसेनं विचारलाय.

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?
व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे एका भाषणादरम्यान शरद पवार आणि तत्कालीन महाराष्ट्र सरकारवर मशिदींसंदर्भातील एका निर्णयावरुन टीका करताना दिसत आहेत. “ती मी सरपोतदारांना सांगणार आहे की, तुमची एक केस कोर्टात नुसती पडून आहे. ती म्हणजे मशिदीवरचे लाऊडस्पीकर्स. हे केव्हा खाली उतरवायचे. कोलकाता हायकोर्टाने निर्णय देऊन टाकलाय की उतरवा, पहिले खाली उतरवा. त्यांनी खाली उतरवले. पण भयानक बातमी हे करत असताना दुसरी येऊन थडकली. ती बातमी कोणती ते सांगतो. ज्या आपल्या महाराष्ट्र सरकारची सुंता झालेली आहे त्यांनी फतवा काढलेला आहे. तो फतवा असाय शरम वाटते, मशिदीमध्ये किती इमाम आहेत त्यांना जर पेन्शन द्यायचं झालच तर किती पेन्शन येईल असा फतवा त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे पाठवलाय. चॅरिटी कमिशनरकडे हा फतवा आलेला आहे की लिहून द्या सगळ्या मशिदींमध्ये किती इमाम आहेत. असेल तर त्यांना पेन्शन द्यायचं झाल्यास किती पैसा खर्च करता येईल याची माहिती त्यांनी मागवलीय, महाराष्ट्र सरकारनं. या शरद पवाराला शरम वाटत नाही? तुम्ही तरी कसे मुडदाडासारखे बसणार आहात. कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये गाडायचीच,” असं बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणात म्हणताना दिसत आहेत. हा व्हिडीओ टीव्ही ९ वरील मुलाखतीदरम्यान राऊत यांना दाखवण्यात आलेला.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं घडलंय काय

तुमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह…
हे भाषण १९९४ चं असल्याचं पत्रकाराने सांगितल्यानंतर संजय राऊतांनी, “बघा तुम्ही ९४ चे, ९० चे बाईट्स आता दाखवून काही उपयोग नाही बरं का. ते बाईट आता दाखवून त्याच्यावरती चर्चा करायची नाही. मला काही दाखवू नका मी ३५ वर्ष त्यांच्यासोबत काम केलंय,” असं संजय राऊत म्हणाले. त्यावर पत्रकाराने, “तुम्ही मला सांगितलं बाळासाहेबांचं म्हणून मी तुम्हाला व्हिडीओ दाखवला. तुमच्या हिंदुत्वावर लोक आता प्रश्नचिन्ह निर्माण करतायत,” असं उत्तर दिलं. त्यावर संजय राऊत यांनी, “अजिबात नाही,” असं म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns slams sanjay raut with reference to balasaheb thackeray old video scsg