मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला. मात्र, मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून आज राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी पाचारण केलं असताना वसंत मोरेंना त्यातून वगळण्यात आलं होतं. अखेर त्यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेनं अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातली घोषणा केली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट फेसबुकवर करण्यात आली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.

वसंत मोरेंचा स्पष्ट नकार!

वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये मी माझ्या प्रभागामध्ये हनुमान चालीसा वाजवणारे भोंगे मशीदींसमोर लावणार नाही असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी आपण राज ठाकरेंवर किंवा पक्षावर नाराज नसल्याचं म्हटलं होतं. “मी एक क्लिअर करतोय की माझी राज ठाकरेंवर किंवा पक्षावर कुठलीही नाराजी नाहीय. पण राजसाहेबांचं भाषण आमच्या कार्यकर्त्यांना कळलंच नाही,” असं सांगितलं होतं. आम्ही आमच्या प्रभागांमध्ये भोंगे न लावता शांतता राखण्याला प्राधान्य देणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्टपणे सांगितलं होतं.

भोंग्याच्या भूमिकेला विरोध केल्याने राज ठाकरे नाराज?; वसंत मोरेंना शिवतीर्थावर निमंत्रण नाही, म्हणाले “मला तर…”

वसंत मोरेंची प्रतिक्रिया

दरम्यान, “मी अकरा महिन्यांसाठीच शहरध्यक्षपद राज ठाकरे यांच्यकडून मागून घेतले होते. साईनाथ बाबर यांची निवड झाली आहे. मला अनेक पक्षांच्या ऑफर आहेत. मी मात्र मनसेतच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

गुढी पाडव्याला राज ठाकरेंनी ही भूमिका मांडल्यानंतर मनसेच्याच काही मुस्लीम कार्यकर्त्यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात अलेल्या ठिकाणी त्यांचं नाव देखील खोडून टाकण्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी भूमिकेला विरोध केला होता. वसंत मोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात जवळपास ७० टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यात राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावलं असताना वसंत मोरेंना टाळल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ती शक्यता आता खरी ठरली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns vasant more removed post oppose raj thackeray stand azaan issue pmw
First published on: 07-04-2022 at 13:50 IST