MNS on Haryana Chhatrapati Shivaji Maharaj Controversy : हरियाणातील सिक्री येथील मिलन बँक्वेट हॉलमधील प्रसाधनगृहाबाहेर दिशादर्शक म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आला आहे. या कृतीमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. असा अवमान हा केवळ निष्काळजीपणा नसून विकृत मानसिकतेचे द्योतक आहे, असं मनसेच्या अधिकृत सोशल मिडिया खात्यावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सांस्कृतिक अस्मितेचा अपमान
“हरियाणातील फरीदाबाद येथील मिलन बँक्वेट हॉलमध्ये स्वच्छतागृहाजवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिकात्मक चित्रांचा वापर झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि निंदनीय आहे. हा प्रकार देशाच्या सांस्कृतिक अस्मितेचा आणि महापुरुषांच्या सन्मानाचा अपमान करणारा आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बँक्वेट हॉलचा मालक भाजपाचा आमदार?
“छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे. या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे मिलन बँक्वेट हॉलचे मालक मुलचंद शर्मा हे भाजपाचे आमदार व माजी मंत्री असून व्यवस्थापन मंडळातील पूनम शर्मा आणि शिवप्रकाश हे दोघेही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. शिवप्रकाश हे तर भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत”, अशी माहिती या पोस्टमधून देण्यात आली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागणारे आणि त्यांच्या प्रेरणेनेच आपण राज्यकारभार करतो असा दावा करणारे सत्ताधारी या विषयावर गप्प का आहेत? स्वतःच्या पक्षाकडून झालेला अपमान त्यांनी गोड मानून स्वीकारण्याचे ठरवले आहे का?” असा प्रश्नही यातून विचारण्यात आला आहे.
“महापुरुषांचा सन्मान हा कोणत्याही पक्षाच्या सोयीचा विषय नसून देशाच्या स्वाभिमानाशी निगडित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, हीच भावना”, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हॉल चालकांविरोधात कारवाईच्या मागणीला जोर
दरम्यान, सोशल मीडियावर याप्रकरणी तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर मिलन बँक्वेट हॉलच्या प्रसाधनगृहांबाहेर लावलेला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांचा फोटो हटविण्यात आल्याची माहिती आहे. याठिकाणी आता दुसरा फोटो लावण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी बँक्वेट हॉलच्या चालकांविरोधात कारवाईची मागणी केली जात आहे.

