अहिल्यानगर:श्रीरामपूरमध्ये तपासासाठी आलेल्या तळेगाव दाभाडे येथील पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्याची घटना घडल्याने पोलिसांना स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार करावा लागला. ही घटना आज, बुधवारी घडली. या घटनेने श्रीरामपूतील इराणी गल्लीमध्ये तणाव निर्माण झाला होता. जमावाच्या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. श्रीरामपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. जमावाचा प्रतिकार होऊनही पोलिसांनी शर्थीने आरोपीला अटक केली.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी आयद बाबूलाल सय्यद (रा. इराणी गल्ली श्रीरामपूर) याचा शोध घेण्यासाठी तळेगाव दाभाडे गुन्हे तपास पथक श्रीरामपूरमध्ये आले होते. उपनिरीक्षक मुकेश मोरे हवालदार अजय सरजीने, संतोष जाधव, प्रीतम सानप, प्रकाश जाधव, किरण मदने या पोलीसांचा त्यात समावेश आहे. या पथकाच्या मदतीला श्रीरामपूरचे स्थानिक पोलीस सुशील होलगीर व महिला पोलीस सविता उंदरे होत्या.
हे सर्व पोलीस पथक खाजगी वाहनाने आज दुपारी इराणी गल्लीत गेले. आरोपीच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने पथक आत गेले. मात्र कुटुंबीयांनी आरोपीस पकडण्यास विरोध केला. पोलीस आले हे समजताच आरोपी पाठीमागील दरवाजातून पळून गेला.
पोलिसांनी पाठलाग केला. पोलीस किरण मदने यांनी कुंपणावरून उडी घेऊन त्याला पकडले. मात्र आरोपीने प्रतिकार करत पोलिसांशी झटापट केली. त्याच वेळी गल्लीतील ३० ते ४० जणांचा जमाव घटनास्थळी जमा झाला. आरोपीने जमावाला उद्देशून दगडफेक करण्यासाठी भावना भडकावणाऱ्या घोषणा दिल्या तर जमावातील पाच ते सात जणांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून खेचून सोडवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर जमावाने एका झेरु नावाच्या तरुणास हल्ल्यासाठी प्रवृत्ती केले. १८-१९ वर्षे वयोगटातील हा तरुण लोखंडी कोयता घेऊन पथकाच्या दिवशी धावला व त्याने किरण मदने यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मदने यांनी बचावासाठी हात पुढे केल्याने वार त्यांच्या उजव्या मनगटावर बसला व ते गंभीर जखमी झाले.
पोलिसांचे जीविताला धोका निर्माण झाल्याने उपनिरीक्षक मोहरे यांनी स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर जमाव पळून गेला. मदतीसाठी स्थानिक पोलीस दाखल होताच आरोपीला पुन्हा बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले. या घटनेची नोंद श्रीरामपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे हवालदार अजय सरजिने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिलांसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
