महिलेच्या वेषातील मोबाइल चोराला जागरूक नागरिकांनी पकडले

दोन भुरटय़ा चोरटय़ांना दुकानाचे शटर उचकटून चोरी करत असतानाच रत्नागिरीतील जागरूक नागरिकांनी रंगेहाथ पकडले.

महिलेच्या वेषातील मोबाइल चोराला जागरूक नागरिकांनी पकडले
प्रतिनिधिक छायाचित्र

रत्नागिरी : शहरातील मोबाइल शॉपी फोडणाऱ्या दोन भुरटय़ा चोरटय़ांना दुकानाचे शटर उचकटून चोरी करत असतानाच रत्नागिरीतील जागरूक नागरिकांनी रंगेहाथ पकडले.  नागरिकांनी त्यातील एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

या दुकानातून ५ लाख २ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूरमहमद दिलमहमद खान (वय २२, रा. मच्छीमार्केट-रत्नागिरी) व आलम वागळे (पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी संशयित चोरटय़ांची नावे आहेत. यापैकी एका चोरटय़ाने महिलांचा गाऊन घातला होता व तोंड पिशवीने झाकले होते. त्यांनी ८९ हजार ९९० रुपयांच्या आयफोनसह मोबाइलचे सुट्टे भाग व हॅंडसेट अशा ५ लाख २ हजार २८४ रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला.  

शंकेश्वर आर्केडमधील एस. एस.  शॉपीचे दुकान आहे. पहाटे दोनच्या सुमारास दोन चोरटय़ांनी दुकानाचे शटर फोडून आत प्रवेश केला. याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना दुकानाचे शटर उघडे असल्याचे दिसले. संशयावरून त्यांनी बघितले असता दोन चोरटे चोरी करत असल्याचे दिसले. या घटनेच्या काही वेळ अगोदर एका रिक्षाचालकाला दोन संशयित व्यक्ती आठवडा बाजार फिरताना दिसल्या. या रिक्षाचालकाने ही बाब गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना सांगितली. ही माहिती मिळताच पोलीस आठवडा बाजार येथे पोहचले. याचवेळी जमलेल्या नागरिकांनी दोन चोरटय़ांना पकडून ठेवले होते. मात्र यातील एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला.  दुकानाचे मालक अमोल डोंगरे यांना पोलिसांनी बोलावून घेतले व दुकानातील माल तपासण्यास सांगितले.    घटनास्थळी तोडलेले कुलूप होते व शटर उचकटण्यासाठी वापरलेली लोखंडी पार देखील मिळाली. दुकानात शिरताना चोरटय़ांनी काचदेखील फोडली होती. एका गोणीत लाखो रुपये किमतीचे महागडे मोबाइल हॅण्डसेट भरून पळण्याचा या चोरटय़ांचा डाव होता. मात्र नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mobile thief caught by conscious citizens in ratnagiri zws

Next Story
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारांची शक्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी