स्वतःचे कपडे काढून अंतरा सोहम बॅनर्जी नावाच्या मॉडेलने ट्रेनमध्ये धिंगाणा घातला. एवढंच नाही तर टीसी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यावर रेझर ब्लेडने हल्ला केला असा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. नेमकी काय घटना घडली जाणून घेऊ.

नेमकी काय घटना घडली?

अंतरा सोहम बॅनर्जी ही ठाण्यातील ३१ वर्षीय मॉडेल एका चित्रीकरणासाठी सुरतला जात होती. डहाणू या ठिकाणी रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर तिला खाली उतरवण्यात आलं आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. अंतराने आरपीएफ कर्मचाऱ्यावर आणि टीसीवर रेझर ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप आहे. तिने कपडे काढून धिंगाणा केला आणि त्यानंतर या दोन कर्मचाऱ्यांवर रेझर ब्लेडने हल्ला केला असा आरोप तिच्यावर आहे. या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. १२ ऑगस्टला ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूज १८ ने हे वृत्त दिलं आहे.

नेमका वाद काय झाला?

एका प्रवाशाने आरक्षित सीटवर बसलेल्या अंतराला जागा रिकामी करण्यास सांगितलं आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली. तिने नकार दिल्याने त्या प्रवाशाने आरपीएफ आणि तिकीट तपासणीसाला बोलावले. यावेळी अंतराने आक्रमक पवित्रा घेत मध्यस्थी करणाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

जीआरपी निरीक्षक कुंदा गावडे काय म्हणाल्या?

बोरिवली जीआरपी निरीक्षक कुंदा गावडे म्हणाल्या, “साक्षीदारांनी सांगितले की अंतरा काहीशी निराश असल्याचे दिसत होते. तिला एसी कोचचे तिकीट मिळाले नव्हते आणि ती स्लीपर क्लासचे तिकीट घेऊन त्या डब्यात आली होती.” पोलिसांनी अंतराला नातेवाईकांशी किंवा कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधण्यास सांगितले, तेव्हा तिने सहकार्य करण्यास नकार दिला आणि स्वतःला अटक करुन घेण्याचा आग्रह धरला. हा प्रकार एका तासापेक्षा जास्त काळ चालला आणि त्यामुळे प्रवासीही घाबरले होते, असंही पोलिसांनी सांगितलं.

सदर घटना १२ ऑगस्टच्या रात्री ९.३० ते १०.५० च्या दरम्यान घडली, तर १३ ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार आरपीएफ एएसआय यामिनी कांत मिश्रा यांनी आरोप केला की, तिकीट तपासणीस हरिकेश त्रिपाठी आणि एका सहप्रवाशाने त्यांना आणि कॉन्स्टेबल राजेश कुमार यांना अंतरा बॅनर्जीने रिझर्व्ह सीट सोडण्यास दिलेल्या नकाराबाबत माहिती दिली होती.

अभिनेत्री अंतरा बॅनर्जी नव्हे, मॉडेल अंतरा सोहम बॅनर्जी!

दरम्यान, सदर घटनेतील मॉडेल व हिंदी मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अंतरा बॅनर्जी यांच्यातील नामसाधर्म्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी सारख्या नावामुळे अभिनेत्री अंतरा बॅनर्जी याच या प्रकरणात गुंतल्या असल्याचा अर्थ काढण्यात आला. त्यामुळे आपल्याला मनस्ताप झाला असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री अंतरा बॅनर्जी यांनी दिली आहे.

“FIR ची साधी पडताळणी केली असती तरी माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट झाले असते. तरीही माझा फोटो वापरून तो अनेक प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित करण्यात आला, ज्यामुळे अनावश्यक गैरसमज निर्माण झाले आणि माझ्या प्रतिमेला धक्का बसला”, असे त्या म्हणाल्या. बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर २४ तासांच्यात आत आपल्याला ९०० हून अधिक फोन कॉल्स, व्हॉट्सअॅप संदेश आणि सोशल मीडिया मेसेज प्राप्त झाल्याचं अंतरा बॅनर्जी यांनी सांगितलं. या घटनेमुळे आपल्याला व आपल्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागल्याचंदेखील अंतरा बॅनर्जी यांनी नमूद केलं.