|| प्रशांत देशमुख
वर्धा : आधुनिक वैद्यकीय प्रणालीकडून सातत्याने  हेटाळणी सहन करणाऱ्या  विविध भारतीय चिकित्सा पद्धतींना आता खुद्द केंद्र सरकारनेच बळ देण्याचे ठरवले आहे. या चिकित्सा पद्धतींना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय विविध नियामक मंडळेही स्थापन करण्यात आली आहेत.

भारतीय चिकित्सा प्रणालींना आधुनिक वैद्यकीय प्रणालीच्या तुलनेत दुय्यम स्थान मिळाल्याची भावना भारतीय चिकित्सेच्या वैद्यांमध्ये नेहमीच राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आयुर्वेद व अन्य भारतीय चिकित्सा पद्धतींवर केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. या क्रमात भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या आयुर्वेद, युनानी, सिद्ध तसेच सोवा रिपा (दक्षिणात्य) या भारतीय प्रणालींवर आता भर दिला गेला आहे. या सर्व प्रणालींसाठी केंद्रीय पातळीवर नियामक संस्था म्हणून भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद कार्यरत होती. आता नव्या आदेशानुसार भारतीय चिकित्सा राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला आहे.

पूर्वीच्या केंद्रीय परिषदेत आयुर्वेद संघटनेचे प्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून येत. तसेच लोकप्रतिनिधी व शासन नियुक्त सदस्य परिषदेचा कारभार सांभाळायचे. मात्र आता राष्ट्रीय आयोगात देशभरातील तज्ज्ञांची नियुक्ती मुलाखतीद्वारे होणार असून ते पूर्णवेळ व पगारी सदस्य म्हणून काम करतील. हा राष्ट्रीय आयोग आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राहणार आहे.

या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आयुष मंत्रालयाला प्रथमच कॅबिनेट दर्जाचा मंत्री (सोनवाल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. यापूर्वी श्रीपाद नाईक हे राज्यमंत्री म्हणून आयुष मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. आयुर्वेद शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांनी भारतीय चिकित्सा प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले आहे. आयोगाच्या माध्यमातून भारतीय चिकित्सा प्रणालींना जागतिक पातळीवर दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे. आधुनिक वैद्यकीय प्रणालीकडून सातत्याने हेटाळणी होत असण्याच्या पार्श्वभूमीवर हे नव्याने झालेले बदल भारतीय प्रणालींना समकक्ष दर्जा प्राप्त करून देण्यास समर्थ ठरतील, असा विश्वास डॉ. भुतडा यांनी व्यक्त केला.

आयोगाचे पहिले अध्यक्षपद नागपुरात

पहिल्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून डॉ. जयंत देवपुजारी (नागपूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव्याने गठित आयुर्वेद मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीनिवास प्रसाद बुरडू (कर्नाटक) यांची नियुक्ती झाली आहे. युनानी, सिद्ध व सोवा रिपा मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. के. जगन्नाथन (केरळ), वैद्यकीय मूल्यांकन व पत निर्धारण मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. रघुराम भट्टा (बंगळुरू) व भारतीय चिकित्सेसाठी असलेल्या नोंदणी मंडळावर अध्यक्ष म्हणून डॉ. राकेश शर्मा (पंजाब) यांना घेण्यात आले आहे. प्रत्येक मंडळात चार सदस्य मुलाखतीद्वारे नेमले जाणार आहेत. त्या सर्वांचा समावेश राष्ट्रीय आयोगात राहील. या सदस्यांची नियुक्ती चार वर्षांसाठी राहणार असून पुनर्नियुक्ती मिळणार नसल्याचे नमूद आहे.