महिन्याला दोन-तीन वेळा पवारांशी चर्चा- नरेंद्र मोदी

‘‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी आणंदला भेट दिली होती. ही भेट केवळ विकासाची कामे दाखविण्यासाठी नव्हती.

‘‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी आणंदला भेट दिली होती. ही भेट केवळ विकासाची कामे दाखविण्यासाठी नव्हती; तर शरदराव पवार यांच्याकडून मी काही शिकावे यासाठी होती. दर महिन्याला किमान दोन-तीनदा आमच्यात चर्चा होत असते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगत पवारांचे कौतुक केले.  राज्य सरकार चालविणे कठीण असते. केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळविण्यासाठी पवारांनी सहकार्य केले,’’ असे सांगून मोदी यांनी बारामतीच्या विकासासाठी पवारांनी दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले. मात्र येथून बाहेर पडल्यानंतर आम्ही एकमेकांवर टीका करू शकतो, हेही स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निवडणुकांच्या काळात एकमेकांवर कडाडून टीका केल्याच्या गोष्टीला इन मिन तीन-चार महिने होतात न होतात तोच मोदी शनिवारी बारामतीला भेट द्यायला आले. यजमान पवारांनी मोदी यांचे तोंड भरून कौतुक केले. मोदींनीही त्याची परतफेड केली.. दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात गळे घालून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला.. मात्र, त्या वेळी व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या व्हॅलेंटाइनचा नेमका अर्थ न उमगल्याने ते गोंधळलेले दिसले.
बारामती येथील कृषी विकास प्रतिष्ठानच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ही ‘युती’ बघायला मिळाली. त्यासाठीचा मुहूर्त होता- १४ फेब्रुवारीचा. अर्थात ‘व्हॅलेंटाइन डे’चा. ‘शरदरावजी’ असा उल्लेख करीत मोदी यांनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली. ‘विवाद आणि संवाद हे लोकशाहीचे सौंदर्य आहे,’ अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. पवार यांनीही भाषणात मोदी यांचे भरभरून कौतुक केले. ‘‘मोदी यांनी मला आणंद येथे बोलावून पशू आणि दुग्धसंवर्धन क्षेत्रात केलेली प्रगती दाखविली होती. आज बारामतीला पंतप्रधान आले आणि येथील शेतकऱ्यांनी केलेली प्रगती मला त्यांना दाखविता आली याचा आनंद आहे असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘चांगल्या कायद्याचा मसुदा बनवणाऱ्यांची कमतरता’
सरकारचे काम कायदे बनवण्याचे आहे; पण चांगल्या कायद्याचा मसुदा बनविणाऱ्यांची कमतरता असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अनेक वेळा कायद्याचा मसुदा चांगल्या पद्धतीने बनविलेला नसल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. शिवाय विविध न्यायालयांमध्ये खटले वा प्रकरणे मोठय़ा संख्येने प्रलंबित राहण्यामागील मूळ कारणही हेच असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच चांगले कायदे तयार करण्यासाठी वकीलवर्गाने सहकार्य करण्याचे आवाहन केले.  वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया’ येथे ‘अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ आयोजित केलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Modi at baramati