भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या येथील श्री गुरुगोविंदसिंघ स्टेडियमवर झालेल्या जाहीर सभेची चर्चा सर्व दूर होत असली, सभेला जमलेल्या गर्दीत अनेकांना ‘हाथ की सफाई’ चा अनुभव आला. त्यात राहुल गांधी नामक व्यापाऱ्यासह अनेकांना लुटण्यात आल्याचे उघडकीस आले.
वजिराबाद भागातील रहिवासी व व्यापारी राहुल गांधी हे मोदींच्या सभेस गेले होते. सभा संपल्यानंतर दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी लांबविली. या प्रकरणी गांधी यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली. एनटीसी मिल भागातील हॉटेल व्यावसायिक ओमप्रकाश सतय्या पंजाला (वय ३०) हे सभा आटोपल्यानंतर गर्दीतून बाहेर पडत असतानाच दोन चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ३२ हजार ७०० रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. हे दोघेही पळून जात असताना फिर्यादीने त्यांचा पाठलाग केला. पैकी एकाला ओमप्रकाशनेच पकडले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी शंकर रमेश उपाडे (वय १९, मल्लापल्ली, अफजल सागर, हैदराबाद) व शिवा या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
मोदींच्या सभेचे वृत्तसंकलन करण्यास गेलेल्या पत्रकार कृष्णा उमरीकर यांच्या पँटच्या समोरील खिशातून चोरटय़ांनी पाकीट लांबविले. त्यात २ हजार २०० रुपये, रशीद तिकिटे, व्हिजिटिंग कार्ड, पासपोर्ट फोटो होते. दुपारी साडेबारा ते साडेतीनच्या दरम्यान हा प्रकार घडला. सभेनंतर परतत असताना सिडकोतील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत चंद्रकांतराव जोशी कलंबकर यांचेही पाकीट लांबविण्यात आले. या पाकिटात एसबीआए बँकेचे एटीएम, निवडणूक मतदार ओळखपत्र, रोख ४ हजार रुपये, वाहनाचे आरसी बुक असा ऐवज होता. विशेष म्हणजे आपले पाकीट मारल्याची तक्रार ते तेथे बंदोबस्तावर तैनात पोलिसांकडे करीत असतानाच चोरटय़ाने मोबाईलही लांबविल्याचे जोशी यांनी पत्रकारांना सांगितले.