लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य न दिल्यास त्या आमदाराला धडा शिकवू, असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. निकालानंतर भाजपचे गोपीनाथ मुंडे यांना सहा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ७ आमदारांचे नक्की काय होणार, ही चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असली तरी मोदी लाटेचा वेग हे कारण पुढे करून पवारांच्या तडाख्यातून आपण निसटून जाऊ, असा या आमदारांचा होरा आहे. परळी, गेवराई, बीड, माजलगाव, केज व आष्टी या मतदारसंघांत मुंडे यांना मोठी आघाडी मिळाली. विशेष म्हणजे जिल्ह्य़ात प्रचारादरम्यान मोदी यांची सभा झाली नव्हती.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आपल्या विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य देण्याचा विडा उचलणारे विधानसभेचे पाच व विधान परिषदेचे दोनही आमदार तोंडघशी पडले आहेत. यात धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, पृथ्वीराज साठे यांसह उमेदवार सुरेश धस यांचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात आहे. धस यांच्या आष्टी मतदारसंघातूनही मुंडे यांना आघाडी मिळाली. विधानसभा निवडणुकीत धस ३० हजार मतांनी निवडून आले होते, हे विशेष.
पालकमंत्री क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघांतून ७६ हजारांनी विजय मिळविला होता. किमान २५ हजारांची आघाडी धस यांना देऊ, असा दावा ते करीत होते. या मतदारसंघातून मुंडे यांनीच आघाडी घेतली. गेवराई मतदारसंघात बदामराव पंडित यांच्या सोबतीला अमरसिंह पंडितही राष्ट्रवादीत दाखल झाले. दोन्ही पंडित एकत्रित आल्याने तेथे इतर पक्ष शिल्लक नसल्याचे चित्र होते. मागील वेळी अमरसिंह पंडित भाजपबरोबर होते, तेव्हा मुंडे यांना २७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. दोन्ही पंडित एकत्र आल्याने राष्ट्रवादीला ३५ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा केला जात होता. प्रत्यक्षात भाजपला ३१ हजार ५०० मतांची आघाडी मिळाली.
चार वष्रे महसूल राज्यमंत्री असलेल्या प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव क्षेत्रातून विधानसभेत साडेपाच हजारांचे मताधिक्य मिळाले. या वेळी भाजपला येथून सर्वाधिक ३४ हजारांचे मताधिक्य मिळाले. दिवंगत विमल मुंदडा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे साडेपाच हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदारसंघातून भाजपला ३२ हजार ५०० हजारांचे अधिक्य मिळाले.
मुंडे यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या परळीतून मागील वेळी लोकसभेला ४४ हजारांचे मताधिक्य मिळाले. या वेळी पुतणे धनंजय मुंडे यांनी या मतदारसंघात भाजपला फारसे मताधिक्य मिळणार नाही, असा दावा केला होता. मात्र, २५ हजारांचे अधिक्य मिळाले. विधानसभेत राष्ट्रवादी व लोकसभेला भाजप अशी जिल्ह्य़ातील पुढाऱ्यांची राजकीय तडजोड असल्याचे बारामतीकरांचा आरोप या वेळीही कायम राहिला. या पाश्र्वभूमीवर अजित पवारांनी भरलेला दम प्रत्यक्षात अमलात येतो का, या प्रश्नाच्या उत्तरात मोदींची लाट एवढाच शब्द उच्चारला जात आहे.