लोकसभा निवडणुकीत देशभरात उमटलेली मोदी लाट विधानसभा निवडणुकीत राहिलेली नाही. राष्ट्रवादीसाठी जिल्ह्यात चांगले वातावरण असले तरी गाफील राहू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील राष्ट्रवादी भवनच्या मैदानावर सोमवारी आयोजित निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. जिल्ह्य़ातील राजकीय स्थितीचा विचार करून काही जुने, अनुभवी आणि काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी कदमबांडे यांचा पराभव झाला
, तो आपल्या जिव्हारी लागला. नंतर धुळेकरांनी महापालिका निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला कौल देत एकहाती सत्ता सोपविली. या निकालातून शहराच्या विद्यमान लोकप्रतिनिधींबद्दल धुळेकरांचा कसा भ्रमनिरास झाला ते अधोरेखित झाले.
आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता जिल्ह्य़ात राष्ट्रवादीसाठी वातावरण चांगले दिसत असले तरी गाफील राहता कामा नये. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जनतेची कामे करावीत, असेही पवार यांनी सूचित केले. जगातील सुंदर शहर करू, रेल्वे मार्ग करू, यांसारखी आश्वासने देणाऱ्या लोकप्रतिनिधी मंडळींनी कोणती आश्वासने पाळली, असा प्रश्न त्यांनी केला. अक्कलपाडा प्रकल्प कालव्याच्या कामाला मंजुरी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. अच्छे दिन आनेवाले है असे म्हणणाऱ्या महायुतीच्या खासदारांना विचारणा केल्यास, महागाई कमी करू असे कुठे आम्ही सांगितले होते, असे सांगितले जाते. मोदी सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्याचे त्यांनी सांगितले.