नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. तसेच दिल्लीतील आंदोलनात काही विद्यार्थ्यांवर ‘पॅलेट गन्स’चा वापर करण्यात आल्याचाही आरोप विरोधक करत आहेत. मात्र, हे आरोप पोलिसांनी फेटाळले आहेत. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापलं आहे.
दिल्लीत झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत ‘जेन-झी’ (Gen Z) आणि ‘जेन-अल्फा’ (Gen Alpha) पिढीतील तरुण व विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी मोहन भागवत यांनी त्यांचं मत मांडलं. तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. तसेच दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज आणि ‘पॅलेट गन्स’च्या आरोपांवरही मोहन भागवत यांनी प्रतिक्रिया दिली.
मोहन भागवत काय म्हणाले?
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवर आणि काही विद्यार्थ्यांवर ‘पॅलेट गन्स’ चालवल्याच्या आरोपांवर तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला हे योग्य की अयोग्य? या प्रश्नावर बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं की, “हे का घडलं? याच्या खोलात जावं लागेल. त्यासाठी जी माहिती पाहिजे, ती आता माझ्याकडे नाहीये. त्यामुळे मला वाटतं की या प्रश्नावरील तुम्हाला आवश्यक असलेल्या उत्तराची अपेक्षा पूर्ण होणार नाही. मात्र, यामध्ये नेमकं खरं काय, खोटं काय, मला माहिती नाही किंवा कुठे गडबड झाली हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. मी आता हे सांगू शकत नाही की ते का घडलं? कशामुळे घडलं? काय झालं? कारण त्याबाबत मलाही सविस्तर माहिती नाही”, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
“मी सकाळी मुंबईत येत होतो, तेव्हा काही न्यूजमध्ये पाहत होतो की काहीजण यामध्ये घुसले आणि त्यांचा भांडाफोड झाला वैगेरे असं मी काही वाचलं. त्यामुळे त्यामध्ये किती तथ्य आहे? हे मला माहिती नाही. मात्र, जर मला डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवायला सांगितलं, तर मी ‘जेन झी’वर विश्वास ठेवेन”, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
“’ते ‘अँटी नॅशनल’ ठरत नाहीत”
“‘जेन झी’ म्हणजे काय? ते आपलेच आहेत. जर त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन केलं तर ते चुकीचं कसं? त्यांचं ऐकून घ्यायला हवं.’जेन झी’ने आंदोलन केलं म्हणून ते आंदोलक देश विरोधी किंवा अँटी नॅशनल ठरत नाहीत”, असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. आंदोलन करणं चुकीचं आहे का? असं विचारलं असता मोहन भागवत म्हणाले आंदोलन हा संवादाचाच एक प्रकार आहे. आपण इथे बसून जसं बोलत आहोत. त्यात मला मुद्दे समजत आहेत, तुम्हाला समजत आहेत. नाहीतर वाद होईल. एखादी गोष्ट सुटण्यासारखी नसेल तर वाद होईल मी तुम्हाला खेचून आणेन. हे आधी करा, असं करेन. लोकशाहीत आंदोलन करणं हे काही गैर नाही. आंदोलन करण्यात काहीही गैर नाही. पण त्याचा उपयोग हा कुठल्याही विभाजनासाठी होता कामा नये. ‘जेन झी’ने जे आंदोलन केलं, त्याचा उद्देश योग्य होता. भारताच्या शिक्षण धोरणात बऱ्याच गोष्टी होणं गरजेचं आहे, त्या होत नाहीत, त्याची चर्चा होते. त्यामुळे संवाद हा असलाच पाहिजे. संवाद साधून जर गोष्टी साध्य होत नसतील काय करायचं हा भाग पुढचा आहे”, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं.
