सोलापूर : मोहोळ तालुक्यातील पेनूर गावच्या शिवारात ऊस आणि मिरचीच्या पिकांमध्ये लावलेली गांजाची ८४ झाडे तसेच वाळवलेला गांजा पोलिसांच्या पथकाने धाड टाकून जप्त केला. या गांजाची एकूण किंमत १७ लाख ३९ हजार ५०० रुपये इतकी दर्शविण्यात आली आहे.

मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर पेनूर गाव आहे. या गावच्या शिवारात वैजिनाथ माणिक जाधव याने आपल्या शेतात ऊस आणि मिरची पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाच्या झाडांची बेकायदा लागवड केल्याची माहिती मोहोळ पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या पथकाने पेनूर शिवारात जाऊन जाधव याच्या शेतावर धाड टाकली. या कारवाईत ८४ गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. याशिवाय तेथे पाच किलो ८५० ग्राम वजनाचा वाळवण्यासाठी ठेवलेला अर्धवट ओलसर गांजाही सापडला. सापडलेल्या ८४ गांजांच्या झाडांसह एकूण १६७ किलो ८७५ ग्राम एवढा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित शेतकरी वैजिनाथ जाधव यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.