पिंपरी चिंचवडमध्ये आता तर थेट पोलिसानेच तक्रार करायला आलेल्या विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित विवाहितेचे वय 36 वर्ष असून आरोपी पोलीस हा सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. राजेंद्र पालवे असं त्या आरोपी पोलिसाचे नाव असून तो साने चौकीत कार्यरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला १० ऑक्टोबरला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्यासाठी साने चौकीत आली होती. त्यावेळी राजेंद्र पालवे या पोलिसाने, ‘मी आहे, तुम्ही घाबरू नका असा आधार देत, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला’. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मध्यरात्री दोन वाजता या पोलिसाने पीडित महिलेच्या मुलाच्या फोनवर फोन केला, आणि आईकडे फोन दे असं त्याला सांगितलं. मुलाने पीडित महिलेकडे फोन दिल्यावर पोलिसाने त्यांची विचारपूस करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि थेट ‘आय लव्ह यू’ म्हणाला. दुसऱ्यादिवशी त्याच्याविरोधात पीडित महिलेने चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दहा तारखेला चिखली पोलीस स्टेशनची स्थापना झाली. त्यानंतर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे.