संगमेश्वर येथील पैसा फंड हायस्कूलच्या इमारत दुरुस्तीबाबत निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी अजित पवार यांनी येत्या मंगळवारी (२० ऑगस्ट) खास बैठक बोलावली आहे.
    या इमारतीची गॅलरी गेल्या ३ ऑगस्ट रोजी रात्री अचानक कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघाताच्या कारणांचा शोध घेतला असता संस्थेच्या विश्वस्त मंडळाने गेली अनेक वष्रे इमारतीची कोणत्याही प्रकारे देखभाल व दुरुस्ती केली नसल्याचे उघड झाले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ बाबल्या शेटय़े यांच्यासह सर्व सदस्यांनी राजीनामा देण्याची मागणी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि संगमेश्वर बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांतर्फे केली जात आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश मुकादम आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्वश्री ओंकार भिडे, मंदार खातू, रिंकू कोळवणकर, राजा भिंगार्डे इत्यादी कार्यकर्ते आले असता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार येत्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीला संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या गटाच्या प्रतिनिधींना पाचारण करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरीच्या सहधर्मादाय आयुक्तांनाही बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
    दरम्यान, इमारतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बसण्याची अतिशय गैरसोय होत आहे. त्यावर उपाय म्हणून दोन सत्रांमध्ये सध्या शाळा चालवली जात आहे. पण त्यासाठी वापरण्यात येत असलेला काही भागही जुनाट व धोकादायक असल्याची स्थानिक ग्रामस्थांची तक्रार आहे. शेटय़े आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सर्व बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्यामुळे हे विश्वस्त मंडळ बरखास्तीच्या मागणीने जोर पकडला आहे. शाळेच्या इमारतीची उत्तम प्रकारे दुरुस्ती करण्यासाठी कित्येक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापेक्षा इमारत पाडून नव्याने बांधणे जास्त सोयीचे होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र विद्यमान विश्वस्त मंडळाबाबत अविश्वासाचे वातावरण असल्यामुळे निधी संकलनालाही प्रतिसाद मिळण्याची फारशी शक्यता नाही.