गणेशाचा अन् बुद्धीचा संबंध प्राचीन काळापासून सांगितला जातो. परंतु लक्ष्मीचा संबंध कधी जोडला जात नाही. या वर्षी गणेशोत्सवात लातुरात लक्ष्मीदर्शनाच्या ‘लाभा’ ची चर्चा चांगलीच रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पाश्र्वभूमीवर शहरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनांचा धडाका सुरू आहे. गेल्या २ वर्षांपासून लातूर महापालिकेतील नगरसेवकांचा चेहरा सातत्याने पडलेला असे. लातूरच्या विकासासाठी म्हणून अनेकांनी २५ लाखांपेक्षाही अधिक गुंतवणूक करून नगरसेवकपद मिळविले. त्यामुळे त्यांना विकासाची चिंता लागून होती. गेल्या २ वर्षांत मनपासाठी आर्थिक तरतूदच सरकार करीत नसल्यामुळे आपल्याला नगरसेवक व्हायची कुठून दुर्बुद्धी सुचली, याबद्दल अनेकजण स्वत:च्याच कर्माला दोष देत होते.
‘खाये पिये कुछ नही, ग्लास फोडे बारा आना’ असाच आपला कार्यकाळ संपणार, या चिंतेने त्यांना ग्रासले होते. कोणत्याही कामासाठी कोणीही ‘म्होरं यायला’ तयार होत नव्हते. सुखकर्त्यांच्या कृपादृष्टीमुळे आता सगळेच ‘म्होरं घे, म्होरं गे’ म्हणायला लागले आहेत. निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीसाठी महापालिकेला कोटय़वधीच्या योजनांची तरतूद करण्यात आली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निविदाही मंजूर झाल्या. पालिकेत काँग्रेसचे प्रचंड बहुमत असतानाही विरोधात राष्ट्र ‘वादी’ कायम वाद घालत असे. आता ‘आम्ही सारे भाऊ भाऊ अन् विकासासाठी हाती घडय़ाळ, बाण घेऊ’ अशी ‘आण’ घेतली जात आहे.
१३३.५५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन छत्रपती शिवरायांच्या पुतळय़ाच्या साक्षीने झाले. सर्व कंत्राट पालिकेच्या कामाचा अनुभव असणाऱ्या अनुभवी कंत्राटदाराला मिळाले. गणपतीच्या काळात याचे भूमिपूजन झाल्यामुळे कार्यक्रमापूर्वीच सर्व भक्तांना (नगरसेवकांना) घरपोहोच प्रसाद पोहोचवण्यात आला. काहीजण यास लाखमोलाचा मानून तृप्त झाले, तर काहींनी अधिकच्या प्रसादाची चौकशी केली. पालिकेत पहिल्यांदाच रुसवा जाऊन ‘स्मित’हास्य पसरले. सर्वच नगरसेवक मोरया, मोरयाचा गजर करीत आहेत (चुकून काहीजण मोरगे, मोरगे म्हणजे ‘दिल मांगे मोअर’ असेही म्हणू लागले आहेत!).
मनपाच्या सर्वसाधारण सभेत आजवर गोंधळ होत होता. ‘रिकामे भांडे’ असल्यामुळे आवाज होणारच, याबद्दल सर्वचजण त्यांचा त्रागा समजून घेऊ शकत होते. आता गणपतीच्या काळात ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्यामुळे रिकामे भांडे काठोकाठ जरी नसले, तरी काही प्रमाणात का होईना भरले आहे. त्यामुळे आता भरलेल्या भांडय़ांचा आवाज बाहेर ऐकू येणार नाही. निदान काही दिवसांची तरी तरतूद झाल्यामुळे गणपती बाप्पाचा उदो-उदो होतो आहे.