मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज; येत्या तीन दिवसांत सर्वत्र संचार

पुणे : तब्बल दोन आठवडय़ाने उशिरा का होईना नैर्ऋत्य मोसमी पाऊस अखेर राज्यात दाखल झाला आहे. कोकणासह दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूपर्यंत दाखल झालेले हे आनंदघन सध्या तळ कोकणात मुसळधार वर्षांव करू लागले आहेत. मुंबईतही दोन दिवसांत पावसाचे आगमन अत्यंत दमदार सरींनी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

मोसमी वाऱ्यांचे प्रवाह सध्या बळकट आहेत. त्याचप्रमाणे पुढील प्रवासासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रवास वेगवान होण्याची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवसांत संपूर्ण राज्य चिंब होणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागांना दिलासा मिळू शकणार आहे.

मोसमी वाऱ्यांचा मार्ग यंदा विविध अडथळ्यांनी अडला होता. अंदमानात दाखल झाल्यानंतर साधारण वेळेनुसार ते १ जूनला केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असताना आठवडाभर उशिराने म्हणजेच ८ जूनला ते केरळमध्ये पोहोचले. त्यानंतर चांगली प्रगती सुरू असताना अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘वायू’ चक्रीवादळाने त्यांची वाट रोखली. चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर बहुतांश बाष्प समुद्रात खेचले गेले. त्यामुळे मोसमी वाऱ्यांचे प्रवाह मंदावून ते केरळच्या आसपासच रेंगाळले. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर १४ जूनला पुन्हा वाटचाल सुरू होऊन मोसमी वारे कर्नाटक, तमिळनाडूत पोहोचले. मात्र, त्यांचा प्रवास काहीसा संथ होता. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा वेग वाढला होता. परिणामी गेल्या चार ते पाच दिवसांत न झालेली प्रगती एकाच दिवसांत होऊन मोसमी वाऱ्यांनी द्रुतगती प्रवास करीत कोकणमार्गे राज्यात धडक मारली.

कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी, गोवा व्यापून मोसमी वाऱ्यांनी कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टी परिसरात सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आहे. आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूपर्यंत मजल मारली आहे.

सलामीलाच अतिवृष्टी?

पुढील ४८ तासांत मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगावसह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबईत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २२ ते २७ जून दरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.