नैर्ऋत्य मोसमी पाऊस मुंबई, पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागांत दाखल झाल्यानंतर रविवारी त्याची फारशी प्रगती झाली नाही. मात्र, त्याच्या वाटचालीत पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण होणार असल्याने पुढील ७२ तासांमध्ये तो राज्याच्या उर्वरित भागांत दाखल होईल. बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात दाखल झालेल्या मोसमी पावसाची उत्तर सीमा शनिवारी मुंबई, नगर, परभणी, यवतमाळ, ब्रह्मपुरी अशी होती. रविवारीही ती कायम होती. छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालचा आणखी काही भाग, सिक्कीम, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, ईशान्य भारत येथे मोसमी पाऊस दाखल होण्यास सध्या पोषक वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, पुढील २४ तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होणार आहे. त्याच्या प्रभावामुळे पुढील दोन ते तीन दिवसात विदर्भ, मराठवाडय़ाबरोबर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे.

मागील २४ तासात मुंबई, कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मुंबई ५० मि.मी., अलिबाग ९० मि.मी., पणजी ५० मि.मी, वेंगुर्ला ३० मि.मी. पावसाची नोंद झाली.

कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज

कोकणात काही ठिकाणी पुढील चोवीस तासांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. सध्या कोकणात पावसाने जोर धरला आहे. १२ जूनपर्यंत या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पडणार आहे. ११ जूनला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडय़ासह उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

रत्नागिरीत पडझड : रत्नागिरी जिल्ह्यत शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत सरासरी १२८.३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणजवळ झाड कोसळले. देवरूखमध्ये दरड कोसळल्याने काही घरांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले.