नांदेड : मग नक्षत्राचा पहिला दिवस जवळपास कोरडा गेल्यानंतर सोमवारी सायंकाळ नंतर जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात वरूणाने ‘धारानृत्या’चे रूप घेतले. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पहिल्या पावसाने जिल्ह्याच्या बागायती पट्ट्यातील अनेक भागांत केळी व इतर फळपिकांच्या बागा आडव्या केल्या. जिल्ह्यातल्या नऊ महसुली मंडलात अतिवृष्टी झाली.
‘मे’ महिन्यात तब्बल तीन आठवडे पाऊस आणि पावसाळी वातावरण अनुभवणाऱ्या जिल्हावासियांना रोहिणी नक्षत्रानंतर पावसाची प्रतीक्षा होती. सोमवारी सायंकाळी नंतर शहर व आसपासच्या भागात वादळीवारे आणि मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला. शेजारच्या अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यातील २५ हुन अधिक गावांना मोठा तडाखा देताना या पहिल्या पावसाने केळीच्या बागा उध्वस्त केल्या.
बारड येथील प्रा. संदीपकुमार देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांशी संपर्क साधत मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरेने यावे, अशी मागणी केली. जिल्ह्याचे नेते खासदार अशोक चव्हाण आणि त्यांच्या आमदार कन्या श्रीजया यांनीही भोकर मतदारसंघातील बागायती पट्ट्यात झालेल्या नुकसानीची नोंद घेत जिल्हाधिकारी तसेच संबंधित तहसीलदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सोमवारी सायंकाळ नंतर अर्धापूर तालुक्यात वादळी पावसाने हाहाकार माजवला. या भागात कुठेही अतिवृष्टीची नोंद झाली नाही. पण घोंगावत आलेल्या वाऱ्याने २५ हुन अधिक गावातील केळीच्या बागा उध्वस्त केल्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. ९ ते १० जून च्या सकाळपर्यंत कंधार, लोहा आणि किनवट तालुक्यातील ९ महसुली मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली.
अतिवृष्टी झालेली मंडले
कंधार- ५५ मि. मी., कुरूळा ८६, फुलवळ – ६८, उस्माननगर – ८१, लोहा – ८१, सोनखेड – ८१, कलंबर – ८१, जलधारा – ७२ आणि शिवणी ६९ मि. मी.
झाडे पडली, वीज खंडित
नांदेड शहरात सोमवारी दिवसभर चांगलेच ऊन पडले होते. सायंकाळनंतर वातावरण बदलले. सुरुवातीला पावसापेक्षा वादळी वाऱ्याचा जोर अधिक होता. नंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. या पावसामुळे अनेक भागात झाडे पडली. काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या. शहर व जिल्ह्याच्या अनेक भागात रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारची सकाळी पावसाळी वातावरण कायम होते.