बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता असून सध्या दडी मारलेला पाऊस ५ जुलैपासून सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मध्य भारतासह राज्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये दमदार पाऊस होऊ शकेल, अशी माहिती हवामान विभागाच्या उपमहासंचालिका डॉ. मेधा खोले यांनी सोमवारी दिली. जून महिना कोरडा गेला असला तरी उर्वरित कालखंडात मान्सून सरासरी भरून काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘मान्सून’ या विषयावर मेधा खोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे आणि सरचिटणीस सुनीत भावे या वेळी उपस्थित होते.
देशाच्या काही भागात वेळेमध्ये दाखल झाल्यानंतर नानौक चक्रीवादळ आणि अनुकूल परिस्थितीच्या अभावामुळे मान्सूनची आगेकूच थांबली. त्याचप्रमाणे मान्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने दडी मारली होती. बंगालच्या उपसागरामध्ये आता एक-दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल. अरबी समुद्रात हवेच्या दाबातील पट्टा वाढला तर किनारपट्टीच्या भागात पाऊस होईल, असे खोले यांनी सांगितले.
हवामान विभागाने २४ एप्रिल रोजी जाहीर केल्यानुसार देशामध्ये सरासरीच्या ९५ टक्के तर, ९ जून रोजी जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार ९३ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशाचा समावेश असलेल्या मध्य भारतामध्ये ९४ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज आहे. एलनिनो, युरोपामध्ये झालेली बर्फवृष्टी हे घटक पावसावर परिणाम करतात. यंदा १ जून ते २९ जून या कालावधीत एकाही जिल्ह्य़ात सरासरीहून अधिक पाऊस झालेला नाही. मात्र, एलनिनो असलेल्या वर्षी दुष्काळ पडेलच असे नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र वगळता राज्यभरात मान्सून सक्रिय झाला आहे. पाऊस आला नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, १९६५, १९७२, १९८७ आणि २००९ या वर्षांत जूनमध्ये पाऊस कमी झाला होता. मात्र, नंतरच्या महिन्यांमध्ये पावसाने सरासरी भरून काढली. त्यामुळे जूनमध्ये पाऊस झाला नाही म्हणून निराश होण्याचे किंवा धीर सोडण्याचे कारण नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन ते सक्रिय झाले तर महाराष्ट्राला फायदा होऊ शकतो, असेही मेधा खोले यांनी सांगितले.